मंत्री आशीष शेलार (फोटो- टीम नवराष्ट्र)
सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला जिल्हा
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात आशिष शेलार यांनी घेतली बैठक
रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खनन, भगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
मालवण तालुक्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्सव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, उपसचिव नंदा राऊत तसेच चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकर, नांदोशी उपसरपंच विजय निकम, संतोष गावकर, हेमंत दळवी, धोंडू चिंदरकर, शुभम मटकर, ग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम सुरू आहे. कोकणाच्या या वारशात सिंधुदुर्गलाही आपला हक्काचा वाटा मिळावा, हे आमचे ध्येय आहे.
बैठकीत घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे
नांदोश गढीचे उत्खनन: मालवण तालुक्यातील २८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नांदोश गढीचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तत्काळ सुरुवात होणार आहे.
भगवंतगडची पाहणी: सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे २.५ एकर क्षेत्रफळातील भगवंतगडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’: मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया तत्काळ सुरू होईल.
या तिन्ही उपक्रमांसाठी स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सदस्य आणि खासगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने काम राबवले जाणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, नांदोश गढी, भगवंतगड आणि रामगड हे इतिहासाचे सजीव प्रतीक आहेत. या ठेव्याचे संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे.