जम्मू-कश्मीरच्या सुंदरबनीमध्ये तीन संशयित...;सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू
Jammu-Kashmir News : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठई मोठ्या प्रमाणात शोधमोहिमही राबवण्यात येत आहेत. या सगळ्यात राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये तीन संशयास्पद व्यक्तींचा वावर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. संशयितांना पकडण्यासाठी आणि परिसरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा संस्था आणि लष्कराचे कर्मचारी परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सैन्याने पहलगामह सह संपूर्ण परिसरात सैन्यबळ तैनात केले असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले बहुसंख्य पर्यटक होते. शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.
सुरक्षा दलांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मुश्ताकाबाद माछिल परिसरातील सेदोरी नाल्याच्या जंगलात शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा एक अड्डा सापडला आणि तो यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आला. यासोबतच लपण्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये ५ एके-४७ रायफल, ८ एके-४७ मॅगझिन, १ पिस्तूल आणि त्याची मॅगझिन, ६६० राउंड एके-४७ गोळ्या, १ पिस्तूल एका राउंड गोळ्यांसह आणि ५० राउंड एम४ गोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला असल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी याला मोठे यश म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून नागरिकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले वाढले असताना ही कारवाई करण्यात आली आहे.