प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील 'त्या' टिप्पणीप्रकरणी कोर्टाचे समन्स (Photo Credit- X)
आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, “आरोपी क्रमांक १ प्रियांक खर्गे आणि आरोपी क्रमांक ३ मोहम्मद नलपाड यांच्या विरोधात BNS, २०२३ च्या कलम ३५६ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्याची दखल घेण्यात आली आहे. कार्यालयाला निर्देश देण्यात येत आहेत की, याची फौजदारी खटला म्हणून नोंद करावी आणि आरोपी क्रमांक १ व ३ यांना समन्स बजावून २१ जुलै २०२६ पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगावे.” तथापि, कर्नाटकचे माजी मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या विरोधात कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला.
ही याचिका बंगळुरूचे रहिवासी आणि आरएसएसचे कार्यकर्ते ए. तेजस यांनी दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, आरोपींनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आरएसएस आणि त्यांच्या सदस्यांना लक्ष्य करून अनेक मानहानीकारक विधाने केली होती. तक्रारीनुसार, मंत्री असताना प्रियांक खर्गे यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटक सरकारला पत्र लिहून आरएसएसला सरकारी क्रीडांगणे, शाळा आणि महाविद्यालये वापरण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. तक्रारदाराचा आरोप आहे की, संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे पत्र जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना दिले गेले आणि खर्गे यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले गेले.
तक्रारीत खर्गे यांनी गेल्या वर्षी १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी केलेल्या कथित सोशल मीडिया पोस्ट्सचाही उल्लेख आहे. एका पोस्टमध्ये म्हटले होते, “आरएसएस सदस्याशी कधीही मैत्री करू नका केवळ मित्रच नाही, तर ते कुटुंबातील सदस्य असले तरीही. ते मुळातच अपमानास्पद किंवा शिवराळ वृत्तीचे लोक असतात.” न्यायालयाने मंत्री प्रियांक खर्गे आणि युवक काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपाड यांच्याकडून २१ जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. मात्र, न्यायालयीन कामकाजाबाबत विचारले असता, मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.






