सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पंजाब : फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात विद्यार्थिनीवरील कथित बलात्काराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला. रविवारी (२७ सप्टेंबर) रात्री विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. काही वाहने, तसेच पोलिसांच्या वाहनांनाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. या हिंसाचारानंतर विद्यापीठ प्रशासनाने २८ सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सेमिस्टर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बाहेरील व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध भागांत तोडफोड केली. काही वाहनांना आग लावण्यात आली, तर विद्यापीठाच्या सुशोभिकरण केलेल्या भागाचेही नुकसान झाले.
विद्यापीठातील मुलींच्या क्रमांक तीन वसतिगृहाबाहेर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी एका प्लंबरवर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती वसतिगृह अधीक्षकांना देण्यात आली होती; मात्र त्यांच्याकडून योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांनी महामार्गावरील वाहतूक रोखल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लाठीचार्जनंतर संतप्त विद्यार्थी पुन्हा विद्यापीठ परिसरात दाखल झाले. त्यानंतर विविध ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांची चार ते पाच वाहने विद्यार्थ्यांनी पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. घटनेनंतर विद्यापीठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने २८ सप्टेंबरपासून दहा दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेमिस्टर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून, परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांना पालकांशी चर्चा करून दहा दिवसांसाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात राहणार आहेत, त्यांनी वसतिगृहातच राहावे आणि विनाकारण बाहेर फिरू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थिनीवरील कथित बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. ઘટનाक्रमाची चौकशी आणि हिंसाचारातील सहभागींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.






