पराभवाच्या भीतीने मतदार यादीत घोळ घालण्याचं कारस्थान; तेजस्वी यादव यांचा मोदी, नितीश कुमारांवर गंभीर आरोप
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. या वातावरणात विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने सुरू केलेला नव्या मतदार यादी रिव्हिजन कार्यक्रम, एका नियोजित कटाचा भाग आहे. गरिबांना आणि वंचितांना मतदानापासून दूर ठेवण्यासाठी हा घाट घातल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत तेजस्वी यादव म्हणाले की, सध्या बिहारमध्ये अनेक भागांत पुराची स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी मतदार यादीत नव्याने फेरफार करणे म्हणजे निव्वळ एक अव्यवहार्य आणि संशयास्पद पाऊल आहे. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे, म्हणूनच मतदार यादीत छुप्या मार्गाने छेडछाड करून मतांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नव्या मतदार यादीसाठी नवी कागदपत्रे मागवली जात आहेत. त्यामध्ये पालकांचे जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र बहुतांश गरीब आणि मागासवर्गीय लोकांकडे नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे मतदानाचे हक्क हिरावले जातील, त्यानंतर त्यांचा रेशन आणि पेन्शन सुद्धा बंद केला जाईल,” असा दावा त्यांनी केला आहे.
मतदार यादीत छेडछाड करण्याचा हा सर्व कट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून रचण्यात आला. मतदार यादीत फेरफार करण्यासाठीच नितीश कुमार यांनी यांनी केंद्र सरकारकडून दबाव आणला. त्यासाठीच नितीश कुमारांच्या सतत दिल्ली वारी होत असतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर RJD याला विरोध करणार असून गरज भासल्यास न्यायालयातही हा विषय नेला जाईल. तसंच, इंडिया आघाडीतील नेते लवकरच दिल्लीतील निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला विरोध नोंदवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Bihar Opinion Poll : या क्षणाला निवडणुका झाल्या तर बिहारवर कोणाची सत्ता? ओपिनियन पोलनी दिला कौल
मुलाखतीदरम्यान चिराग पासवान यांच्याविषयी विचारले असता, तेजस्वी यादव म्हणाले की, ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याने फारसा फरक पडणार नाही. केंद्रीय मंत्री असताना चिराग पासवान यांनी बिहारसाठी नेमके काय केले आहे हे दाखवून द्यावं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बिहारची जनता आता जागरूक झाली आहे. लोकशाहीच्या हत्येचा प्रयत्न करणारं कोणत्याही कारस्थान यशस्वी होणार नाही. RJD आणि संपूर्ण विरोधक या प्रकाराविरोधात एकजूट होऊन लढा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.