बिहार निवडणुकीत महाआघाडी जिंकली तर कोण होणार CM? कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी थेट नावच जाहीर केलं
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महाआघाडीत कोणताही गोंधळ नाही, जर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, आरजेडीच्या महायुतीचा विजय झाला तर तेजस्वी यादवच मुख्यमंत्री बनतील, याबाबत कोणताही गोंधळ नाही, असं कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
Bihar Opinion Poll : या क्षणाला निवडणुका झाल्या तर बिहारवर कोणाची सत्ता? ओपिनियन पोलनी दिला कौल
राष्ट्रीय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कन्हैया कुमार म्हणाले, “महाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार याबाबत कोणताही संभ्रम नाही. तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. आरजेडी सर्वात मोठा पक्ष असून महाआघाडीचं नेतृत्व करत आहे. आरजेडीच्या नेतृत्त्वात महाआघाडी निवडणुका लढवत आहे. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. मात्र निवडणूक काळात विरोधकांकडून या मुद्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले.
कन्हैया कुमार यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. भाजपला संधी मिळताच ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बाजूला सारून बिहारमध्ये आपला नेता बसवला जाईल. आधी प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करा आणि मग त्यांना हळूहळू संपवा, ही भाजपची जुनी रणनीती असल्याची त्यांनी टीका केली.
या वेळच्या निवडणुकीत बिहारमध्ये परिवर्तन होणार आहे. लोकांमध्येही ती भावना आहे. मागच्या निवडणुकीत बालाकोटचा मुद्दा होता. मात्र यावेळी भाजपकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रचार केला जात नाही. कारण जनतेला हे राष्ट्रीय सन्मानाचं प्रकरण वाटतं. कोणताही पक्ष याचं राजकारण करत असलेलं जनतेला खपत नाही.
महाआघाडीत आरजेडी ही सर्वात मोठी पार्टी असली तरी इतर घटक पक्षांचं महत्त्वही कमी नाही, असं कन्हैया यांनी सांगितलं. “गाडी चालवण्यासाठी क्लच जितका महत्त्वाचा, तितकाच ब्रेक आणि रिअर व्ह्यू मिररही गरजेचा असतो,” अशा शब्दांत त्यांनी घटक पक्षांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं. काँग्रेससह डाव्या पक्षांपासून ते आता विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी यांचाही यामध्ये समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली.
2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपने 74 आणि जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. त्यावेळी एनडीएच्या आघाडीने सत्ता टिकवली होती आणि नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री बनले होते. आता पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी एकत्र येत ताकद पणाला लावली आहे. यंदा सत्तांतर होण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतो आहे. बिहारमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.