नवी दिल्ली – मेटाची पॅरेंट कंपनी व्हॉट्सअॅपने शनिवारी नववर्षाच्या निमित्ताने भारताचा चुकीचा नकाशा जारी केला. त्यानंतर केंद्राने त्याला या चुकीप्रकरणी इशारा जारी केला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअॅपला स्वतःची चूक सुधारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंपनीने माफी मागून भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री दिली.
नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅपने जगाचा नकाशा शेअर केला होता. त्यात पाकव्याप्त काश्मीर व चीनचा काही भाग भारतापासून वेगळा दाखवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर कंपनीने हे ट्विट डिलीट केले.
व्हॉट्सअॅपने शनिवारी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर नववर्षाच्या पूर्वसंध्येचे लाईव्ह स्ट्रीमिंग शेअर केले. नव्या वर्षोाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत थांबण्याची गरज नाही. तुम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येला आमचे लाइव्ह स्ट्रीम पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला नववर्षाचे शुभेच्छा संदेश केव्हा पाठवता येतील याचा अंदाज येईल, असे कंपनी म्हणाली. या संदेशासोबत कंपनीने भारताचा चुकीचा नकाशा जोडला होता.