Tusnami-resistant metro station: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळील समुद्रात ८.८ तीव्रतेच्या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक प्रदेश हादरला आहे. या भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की रशिया आणि जपानच्या किनारपट्टी भागात ४ मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या. या नंतर रशिय प्रशासनाने सकर्तकेचा इशारा जारी केला असून समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या त्सुनामीमध्ये किनारपट्टीवरील अनेक इमारती बुडाल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी शहरी भागात शिरले आहे. रशियाच्या सखालिन प्रदेशात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तर उत्तर कुरिल बेटांवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
त्याच वेळी, जपानच्या राष्ट्रीय हवामान विभागाकडून लाटा आणखी मोठ्या होऊ शकतात असा इशारा दिला आहे. पूर्व आणि उत्तरेकडील किनारी शहरांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने हवाई, ग्वामा आणि कॅलिफोर्नियाच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. भविष्यात अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताने आता तयारी सुरू केली आहे. पण त्याचवेळी भारतात एक असे मेट्रो स्टेशन बांधले जात आहे जे पूर्णपणे त्सुनामी प्रतिरोधक असेल.
रशिया आणि जपानसारख्या देशांना त्सुनामीसारख्या समुद्रातून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसतो. अशा आपत्तींपासून बचाव करण्यासाठी भारतानेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चेन्नईतील मरीना बीचजवळ उभारले जाणारे ‘लाइटहाऊस मेट्रो स्टेशन’ हे देशातील पहिले त्सुनामी-प्रतिरोधक मेट्रो स्टेशन ठरणार आहे.
या स्टेशनची रचना चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड (CMRL) ने विशेष युरोपीयन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली आहे. या रचनेत स्वयंचलित पूरदरवाज्यांचा समावेश असून, समुद्राची पातळी वाढल्यास हे दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे समुद्राचे पाणी स्टेशनच्या आत शिरू शकणार नाही.२००४ साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीनंतर मरीना बीच परिसरातील सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन हे अत्याधुनिक व संरक्षक पाऊल उचलण्यात आले आहे.
Malegaon Bomb Blast Case: ‘ती’ चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही
लाईटहाऊस मेट्रो स्टेशनची लांबी ४१४ मीटर आणि रुंदी ३५ मीटर आहे, ज्यामुळे ते चेन्नई सेंट्रल मेट्रो स्टेशनपेक्षा मोठे आहे. या स्थानकात १२ गाड्या सामावून घेण्याची क्षमता असलेले ६ ट्रॅक आहेत आणि त्याचे प्लॅटफॉर्म कॉन्कोर्स पातळीच्या वर आहेत. त्याच वेळी, फ्लेमिंगो नावाची टनेल बोरिंग मशीन येथे २ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदत आहे, जो स्टेशनला कचारी रोड आणि थिरुमयलाई मेट्रो स्टेशनशी जोडेल. चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, हा कॉरिडॉर २०२५ ते २०२८ दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल.
रशिया आणि जपान सारख्या विकसित अर्थव्यवस्था अजूनही नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहेत. त्याच वेळी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पुढे जात आहे. चेन्नईचे त्सुनामी प्रतिरोधक स्टेशन केवळ भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बांधले जात नाही तर ते जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी एक उदाहरण देखील बनू शकते.