File Photo : Court Decision
चेन्नई : एक गृहिणीचा आपल्या पतीच्या अर्ध्या संपत्तीवर हक्क (Husband Property) असतो, असा निर्वाळा मद्रास हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठाने (Madras High Court) ही टिप्पणी केली. एक पत्नी कोणतीही सुटी न घेता २४ तास घरात काम करत असते, त्यामुळे हे बरोबर असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
कोर्टाने यावेळी म्हटले की, कित्येक दशकांपासून आपण पाहत आलो आहे, पत्नी एक संपूर्ण घर सांभाळते. लग्नानंतर कित्येक मुली पती आणि मुलांच्या संगोपनासाठी स्वतःची नोकरी सोडून देतात. यामुळे शेवटी त्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच उरत नाही. आपल्या घरात 24 तास काम करणाऱ्या महिला, कुटुंबातील सदस्यांना प्रथमोपचार पुरवतात. तसेच, घरातील कुणीही व्यक्ती आजारी पडली तर त्याची देखभाल देखील गृहिणी करतात. यामुळे त्या घरगुती डॉक्टरच असतात, असे हायकोर्ट म्हणाले.
पत्नीशिवाय पती अपूर्ण न्यायमूर्ती रामास्वामी यावेळी म्हणाले, की आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी पत्नीच्या मदतीशिवाय पती पैसे कमवू शकत नाही. पतीने खरेदी केलेली संपत्ती पत्नीच्या नावावर नसली, तरीही ती दोघांनीही एकत्रितपणे प्रयत्न करुन साठवलेल्या पैशांतून घेतली आहे असे मानण्यात यावे.
काय आहे प्रकरण?
कंसाला अम्माल या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे मत मांडले. या महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर संपत्तीत हक्क मागितला होता. एका स्थानिक कोर्टाने 2015 साली कंसाला यांची याचिका रद्द केली होती. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने कंसाला यांना पतीच्या संपत्तीतील 50 टक्के वाटा मिळावा असा निर्णय दिला.
घरातील गृहिणीच्या योगदानाला मान्यता मिळण्याबाबत अजून कोणताही कायदा अस्तित्वात नाही. मात्र, कोर्ट हे योगदान नक्कीच पाहू शकते. महिलांनी केलेल्या त्यागासाठी त्यांना योग्य न्याय मिळावा, याची खात्री करणे हे कोर्ट नक्कीच करू शकते, असे न्यायमूर्ती रामास्वामी यावेळी म्हणाले.