टेंभुर्णी / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : टेंभुर्णी शहरातील दोन्ही मध्यवर्ती तलावाच्या स्वच्छतेसाठी व डागडुजीसाठी ग्रामपंचायत निधीतून पंधरा लाखाची तरतूद करण्यात आली आहे तर शहरातील पुरातन वेशीच्या कामासाठी ग्रामनिधीतून वेशीच्या दुरुस्तीसाठी पाच लाख असा एकूण 20 लाख रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे यांनी दिली आहे.
जगावर आलेल्या कोरोणासारख्या महाभयंकर संसर्गामुळे प्रशासकीय स्थरावर सदरच्या कामाचा निधी रखडल्याने टेंभुर्णी येथील मध्यवर्ती भागात असलेल्या दोन्ही तलावांवर घाणीचे साम्राज्य पसरले होते.तेथील राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आत्ता ग्रामपंचायतीने निधीची तरतूद करून तेथील तलावांच्या समस्यांचे निर्मूलन केले आहे.या कामामुळे येथील नागरिकात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर दोन्ही तलावाच्या कामांमध्ये दोन्ही लोखंडी जाळीची संरक्षण भिंतीला कंपाउंड करणे व तलावातील घाण, दूषित पाणी,जलपर्णी वनस्पती सह बंद पाईपलाईन द्वारे निचरा करणे. अशा कामाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशासकीय काम लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल अशी माहिती ग्रामपंचायत कडून मिळालेली आहे.