आज पारंपरिकरित्या सगळीकडे होळी साजरी केली जात आहे. रंगांची उधळण होत आहे. मराठी सिनेसृष्टीमध्येदेखील सगळे सेलिब्रिटी एकत्र येऊन होळी खेळतात. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी होळी खेळणं टाळलं आहे. मात्र आजही होळीच्या अनेक आठवणींमध्ये हे सेलिब्रिटी रमून जातात. होळीच्या अशाच काही निवडक आठवणी अभिनेता संतोष जुवेकरने नवराष्ट्रचे प्रतिनिधी स्मिता मांजरेकर यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीतमध्ये शेअर केल्या आहेत.कोरोनामुळे दोन वर्षे होळी खेळलो नाही. पण यंदा लोकांमध्ये होळीचा उत्साह आहे. होळीच्या आठवणींमध्ये माझी लहानपणीची होळी ही खूपच स्पेशल आहे. घराघरात जाऊन होळीची वर्गणी काढायची. लाकडं जमा करायची. त्याने ती होळी बांधायचो, ती छान सजवायचो. त्यानंतर गा-हाण घालून होळीला सगळे मिळून प्रार्थना करायचो. होळी पेटली की त्यात वर्षभराची सगळी दु:ख, ईडापिटा जळून जाऊन देत ही मागणी करत मग दुस-या दिवशी रंगपंचमी खेळायचो. माझं बालपण कळवामधलं. त्यामुळे सगळी मुलं एकत्र येऊन धमाल-मस्ती करत होळी साजरी करायचो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे आपल्या आयुष्यातली रंग उडून गेली होती, ते रंग यंदा होळीच्या निमित्ताने परत आपण आपल्या आयुष्यात भरूयात.
सेलिब्रिटींची होळी
आमची ठाण्यात सेलिब्रिटींची होळी असते. आम्ही सगळे सेलिब्रिटी तिथे जमून धुळवड खेळून कल्ला करायचो. पण कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे आम्ही भेटलेलो नाही. यंदा देखील आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजीपोटी होळी खेळणार नाही आहोत. मी साता-यात शूटिंग करतो आहे. त्यामुळे तो सारा उत्साह नककीच मीस करेल.
रंग खेळताना काळजी घ्या
होळीचा रंग वापरताना सगळ्यांनी काळजी घ्यावी. केमिकलचे रंग वापरू नये. जेणे करून आपल्या त्वचेला इजा होईल. इतर लोकांना त्रास होईल असे रंग वापरू नका असं आवाहन मी सगळ्यांना करतो. इकोफ्रेन्डली रंग वापरा. काही जण ऑईलपेंट वापरतात. सिल्व्हर रंग वापरतात, हा खरंतर मुर्खपणा आहे, अशा गोष्टी टाळा.
कोकणातला शिमगोत्सव
होळीचा सण कोकणात मोठ्याप्रमाणात साजरा करतात. तिथे त्याला शिमगा म्हणतात. मलादेखील तिथला शिमगोत्सव एकदा साजरा करता आला होता. होळीला आमच्याघरी आई पुरणपोळी बनवते. आजही हाच बेत आहे.
होळी आणि भांग
होळीला भांग पितात. मी अकरावीला असताना पहिल्यांदा भांग प्यायलो होतो. तेव्हा माझं माकड झालं होतं. त्यानंतर मी कधीच भांग प्यायलो नाही. यंदा होळी सगळी काळजी घेऊन साजरी करा असंच मी माझ्या लाडक्या फॅन्सला सांगेल आणि पुढच्या वर्षी आम्ही सगळे कलाकार जमून नक्की होळी खेळू.