मुंबई- शिवसेना (Shivsena) हे पक्षनाम आणि धनुष्यबाण (Shivsena Symbol )हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्यानंतर आता ठाकरे गटात आणखी फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या निर्णयाचा शिंदे गट आणि भाजपाला (BJP) फायदाच होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतायेत. आधीच ठाकरे गटाची सत्ता गेलेली आहे. शिंदे हे सत्तेत आहेत, अशा स्थितीत सध्या जे ठाकरे गटातील नेते कुंपणावर होते तेही आता शिंदे गटात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. ठाकरे गटही याबाबत सतर्क झाला आहे. उद्धव ठाकरे (Udhhav Thckeray) यांनी या निर्णयानंतर राज्यातील आमदार आणि खासदारांची बैठक आज मातोश्रीवर बोलावली असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाकडून जी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आाहेत. त्यात एका ठाकरे गटातील खासदाराने विरुद्ध बाजूचे म्हणजेच शिंदेंच्या बाजूचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या १३ खासदार आहेत. हा खासदारही शिंदे गटात गेल्यास ही संख्या १४ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या खासदाराचे नावा अद्याप समोर आलेले नाही.
या निर्णयाचा मोठा फायदा शिंदे यांना होईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयामुळे जे सध्या कुंपणावर होते. जे राजकीय परिस्थिती काय उद्भवू शकते याचा विचार करत होते. तेही आता शिंदे गटात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्यात अनेक ठिकाणी हे दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
हा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी यपूर्वीही अनेक जण गेले, आताही जातील. त्यांना कुणीच अडवू शकणार नाही. मात्र रक्तांच्या नसानसात शिवसेना असलेला शिवसैनिक हा त्याचा बाप असा बदलणार नाही, असं ते म्हणाले. शिंदेंसोबत गेलेले आमदार हे बाजारबुणगे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राज्यातील जनता या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचं राऊत म्हणालेत.
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानं आता शिंदे गटाचा आत्मविश्वासा वाढलेला आहे. आत्तापर्यंत ठाकरे गटाकडजून गद्दार म्हणून त्यांची संभावना करण्यात येत होती. आता आयोगानं शिंदे गटच शिवसेना असल्याची मान्यता दिल्यानं आगामी काळात शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे आणि दोन्ही गटांची ताकद असलेल्या शहरांत अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकेमेकांसमोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.