कराड : कराड पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य (Panchayat Samiti Member) व सत्यजित ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नामदेव पाटील व त्यांचे बंधू बाळासाहेब पाटील व मुंकुद पाटील यांच्यासह अनोळखी इसमांनी येथील प्रसिध्द आर्किटेक्ट संजय भंडारी व जितेंद्र भंडारी यांनी जबर मारहाण केल्याची घटना १७ नोव्हेंबरला घडली. या मारहाणीत जितेंद्र भंडारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कृष्णा हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याप्रकरणी जितेंद्र भंडारी (रा. शनिवार पेठ, कोयना दूध कॉलनी, कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून, नामदेव पाटील, बाळासाहेब पाटील, मुकुंद पाटील, राजू (पूर्ण नामाहित नाही)रा. सर्व वारूंजी यांच्यासह अन्य तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नामदेव पाटील यांनीही जितेंद्र व संजय भंडारी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र पारसमल भंडारी (रा. पाटणकर कॉलनी, कराड) हे २००४ पासून आर्किटेक्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचे पार्श्व आर्किटेक नावाची फर्म आहे. २०१०-११ मध्ये नामदेव पाटील यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचे दहा ते बारा बांधकाम प्रकल्प भंडारी यांनी केले आहेत. त्यामध्ये वारूंजी येथील नामदेव पाटील यांच्या कुसुमावली वाड्याचाही समावेश आहे. तेव्हा त्यांना ठरलेले रक्कमेप्रमाणे ६ लाख रूपये देण्यात आले होते. २०१८ मध्ये सत्यजित ग्रुपतर्फे हॉटेल, मल अपार्टमेंट बांधकाम करावयाचे असल्याने सत्यजित ग्रुप आणि पार्श्व आर्किटेक यांच्यामध्ये आर्किटेक्चरल फी संबंधी नोटरी करारपत्र झाले.
त्यानंतर सदर ठिकाणी काम सुरू झाले. २०१९ मध्ये महापुरामध्ये थोडे दिवस बांधकाम थांबले. एप्रिल २०२० मध्ये पुन्हा कामास सुरुवात झाली. त्यानंतर सत्यजित ग्रुपकडून सदरचा प्रोजेक्ट हा इथून पुढे नयन पाटील (बाळासाहेब पाटील) यांचा मुलगा पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. भंडारी यांना आम्ही तुमच्या बरोबर काम करणेस इच्छुक नसल्याचे ई मेलद्वारे कळवण्यात आले. काही दिवसांंनी पुन्हा ईमेल करून तुमची उर्वरित फी थोड्या दिवसांनी देतो, असेही ई मेलव्दारे भंडारी यांना कळवले.