सामाजिक आणि राजकीय स्वच्छतेची भाषा वापरीत राजकारणाच्या दलदलीत शिरलेल्या आम आदमी पक्षाचे पायही इतरांसारखेच चिखलानं माखलेले आहेत, हे गेल्या ११ वर्षांतील प्रवास पाहून अनेकांच्या लक्षात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्याभोवती या पक्षाची सारी सूत्रं केंद्रीत आहेत. आपल्या छोट्या प्रवासात त्यांनी राजकारणातील कडू-गोड अनुभवाची चव चाखली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनंतर आता अंमलबजावणी संचालनालया (ईडी)कडून त्यांनाही
दारू घोटाळ्यानंतर आता दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना तसंच ‘सीबीआय’ला पत्र लिहून दिल्ली जल बोर्डातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिल्ली जल बोर्डात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. या नव्या आरोपावर स्पष्टीकरण देताना आम आदमी पक्षानं म्ह़टलं आहे, की दिल्ली सरकारनं याबाबत आधीच तक्रार केली असून केंद्र सरकार कारवाई करत नाही. ‘आप’चं म्हणणं आहे, की जर काही चुकीचं झालं असेल, तर ते अधिकाऱ्यांनी केलं आहे. मंत्रालयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आज केजरीवाल अशा वळणावर उभे आहेत, जेव्हा त्यांचे अनेक सहकारी तुरुंगात आहेत आणि ते स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडले आहेत . पुढची लढाई लांब आहे आणि खूप कठीणदेखील आहे. भ्रष्टाचाराबाबत केजरीवाल यांचं स्पष्टीकरण अपुरं आहे. २६ नोव्हेंबरला आम आदमी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त केजरीवाल म्हणाले, की गेल्या ११ वर्षात जनतेनं आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे. जनतेच्या आशीर्वादानं आणि कष्टानं तसंच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळं दोन राज्यात आमची सरकारं झाली. आज आम आदमी पक्षाची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. प्रत्येक राज्यात आमचे कार्यकर्ते आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. केजरीवाल यांचं हे यश नगण्य नाही; पण या चित्राची दुसरी बाजू खूपच उदास आहे. केजरीवाल म्हणतात, ‘आंदोलनाच्या वेळी रामलीला मैदानात लोक आम्हाला विचारायचे, की तुम्ही लोक भविष्यात भ्रष्ट होणार नाही याची काय शाश्वती?’ केजरीवाल यांना जनतेनं विचारलेला प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे. काही लोक अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणामुळं पूर्णपणे निराश झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केजरीवाल जे काही बोलले, त्याला बळीचे पत्ते खेळणं म्हटलं जाईल. आता जसे भाजपचे नेते केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत तसेच आरोप पूर्वी केजरीवाल इतरांवर करायचेय. त्यात फरक काय? रामलीला मैदानावरील आंदोलनात केजरीवाल यांना भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना केजरीवाल काय समजावण्याचा प्रयत्न करत आहेत? ते म्हणतात, ‘आज मी सांगू इच्छितो, की भारताच्या इतिहासात आम आदमी पक्षाला ११ वर्षात जे लक्ष्य गाठता आलं, ते इतर कोणत्याही राजकीय पक्षाला साध्य झालं नाही. काही अंशी ते खरं आहे.
‘आप’च्या नेत्यांविरोधात २५० हून अधिक खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत. गेल्या ११ वर्षात ‘ईडी‘, ‘सीबीआय’, ‘आयटी’, दिल्ली पोलीस अशा सर्व एजन्सी मागं लागल्यचा आहेत. आजपर्यंत एकही पुरावा, एक पैसाही सापडला नाही हेच सर्वांत मोठं प्रमाणपत्र आहे, असं केजरीवाल सांगत आहेत. केजरीवाल जनतेच्या दरबारात विजयी होत आहेत. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही चूक केली नसेल, तर देशाची न्यायव्यवस्था त्यांना काहीच करू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास असायला हवा. न्यायव्यवस्था अजून कुणी विकत घेऊ शकलेलं नाही. न्यायव्यवस्थेचं हे सौंदर्य आहे, की आरोपीलाही संशयाचा फायदा मिळतो. एखाद्यानं काही चूक केली असली, तरी पुराव्याअभावी तो त्यातून सुटू शकतो; पण याचा अर्थ असा नाही की नुकसान होणार नाही. सर्वात मोठं नुकसान वेळेचं होईल. दूध का दूध आणि पानी का पाणी होईल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. राजकारणात वेळेलाही खूप महत्त्व असतं. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या केजरीवाल यांच्यासाठी अजूनही लोकांचा पाठिंबा ही सर्वात मोठी गोष्ट आहे. एकेकाळी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र कवी कुमार विश्वास त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत; पण हेही विसरता कामा नये की, कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर दोन कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता, तेव्हा कुमार विश्वास यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि योगेंद्र यादव यांनीही तसंच केलं. त्याच यादव यांना आधीच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, तर कुमार विश्वास यांनीही अंतर राखलं होतं. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आरोपांची, टीकेची कोणतीही कसर सोडलेली नाही; पण दिल्लीतील केजरीवाल यांच्या मतदारांवर कोणताही परिणाम झालेला नाही. दिल्लीच्या निवडणुकीत आणि पंजाबमध्येही केजरीवाल यांना भ्रष्ट आणि दहशतवाद्यांशी संबंध असलेला नेता सिद्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला; पण लोकांनी भरभरून मतदान केलं आणि ‘आप’चं सरकार स्थापन झालं. यावर विश्वास ठेवणारे काही सामान्य लोकही आहेत. दिल्लीत ‘आप’नं ७० पैकी ६२ जागा जिंकल्या. ११७ सदस्यीय पंजाब विधानसभेत ९२ आमदारांसह सरकार स्थापन केलं आहे. गोव्यात दोन आणि गुजरातमध्ये पाच आमदार निवडून आले आहेत. चंदीगड महानगरपालिकेतही आम आदमी पक्षाचा विजय झाला आणि त्यानंतर दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही. केवळ जनतेलाच नाही तर केजरीवाल यांच्या राजकारणातही हा एकमेव आशेचा किरण उरला आहे.
– भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com