भारतातल्या समाजकार्याचा इतिहास फार पुरातन आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्याही आधीच्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीचा मुख्य उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून अनेक सामाजिक संस्था सुरु झाल्या. स्वातंत्र्यप्राप्ती आणि समाजसुधार अश्या दोन्ही विषयांवर काही संस्था काम करीत होत्या तर काही मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी मार्गांचा अवलंब करीत प्रयत्न करीत होत्या.
१९२० च्या दशकात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या नेत्यांना चळवळीतील युवकांना कॉंग्रेसशी जोडून ठेवण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून त्यावेळचे कॉंग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते ना. सु. हर्डीकर यांनी युवक संघटना म्हणून “हिंदुस्थानी सेवा मंडळ” ची स्थापना १९२४ साली केली. ही सुरुवात राजकीय उद्देशासाठी असली तरी, एक नवीन आकर्षण म्हणून हि चळवळ तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागली होती. नागपूर मध्ये झालेला ध्वज सत्याग्रह, आणि इतर आंदोलने याचा मुख्य भाग होते. १९३२ साली ब्रिटीश सरकार ने यावर बंदी घातली, आणि नंतर याचेच रुपांतर कॉंग्रेसची एक युवक शाखा म्हणून “कॉंग्रेस सेवा दल” नावाने काम करू लागली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या कालावधीत मात्र डोळ्यासमोर कुठलेही ठोस उद्दिष्ट नसलेली, केवळ आणि केवळ राजकीय सत्तालाभासाठी प्रयत्न करणारी संघटना आणि पार्टी प्रमुखांच्या मागे लोढणे म्हणून असलेले हिचे स्वरूप उरले आहे. गेल्या काही वर्षात तर “कॉंग्रेस सेवा दल” नावाचे काही अस्तित्वात होते हे देखील कॉंग्रेसजन जणू विसरून गेले होते, त्यामुळे स्वतंत्र भारतात “कॉग्रेस सेवा दलाचे” सामाजिक कार्य शून्य झाले असे म्हंटले तरी हरकत नाही.
याच काळात म्हणजे, २५ डिसेंबर, १९२५ साली कानपूर मध्ये स्थापन झालेल्या “कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया” च्या रूपाने भारतात साम्यवादी चळवळीचा प्रारंभ झाला. साम्यवादी चळवळीचा मुख्य उद्देश्य हा नेहमीच वर्ग संघर्ष आणि सत्ताप्राप्ती हाच राहिला आहे. त्यामुळे तत्कालीन साम्यवादी नेत्यांनी समाजसेवा, सामाजिक उपक्रम किंवा रचनात्मक कामाकडे कधीही लक्ष दिले नाही. जागोजागीच्या पिडीत, शोषित आणि दुर्लक्षित समाजापर्यंत जाऊन साम्यवादाचे भ्रामक स्वप्नरंजन करून वर्ग संघर्ष पेटवायचा आणि शक्यतो सत्ता हस्तगत करायची, हेच प्रमुख कार्य त्यांचे राहिले आहे. अर्थातच सुरुवातीच्या काळात एक आदर्श, स्वप्नवत वाटणारी चळवळ प्रत्यक्षात मात्र बेगडी आहे, हे सतत संघर्षच करीत राहिलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या समाजाला लक्षात आले आणि त्यांना मिळणारे समर्थन हळूहळू कमी व्हायला लागले. झारखंडच्या आदिवासी भागात १९८० च्या दशकात याच वर्ग संघर्षाच्या नावाने एमसीसी (MCC) या साम्यवादी चळवळीने माजवलेल्या दहशतीला त्या भागात एकल विद्यालय नावाच्या रचनात्मक कार्यामुळे जागोजागी विरोध होऊ लागला, आणि काही वर्षातच ही चळवळ संपूर्णपणे नष्ट झाली. बंगाल, बिहार, केरळ, छत्तीसगड, उत्तर पूर्वांचल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोली यासारखे काही पॉकेट्स सोडले तर साम्यवादी चळवळ आता संपुष्टात आली आहे. त्यातूनही “समाजकार्य” म्हणून कोणते काम नक्की साम्यवाद्यांच्या खात्यावर जमा करावे हा प्रश्न ही आहेच.
“कॉंग्रेस सेवा दला” च्या कल्पनेतूनच प्रेरणा घेऊन तत्कालीन कॉंग्रेसजनांशी न पटल्यामुळे ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, वि.म. हर्डीकर, शिरुभाऊ लिमये यांसारख्या जेष्ठ समाजवादी नेत्यांनी एकत्र येऊन पुण्यात ४ जून, १९४१ रोजी, समाजवादी विचारांवर आधारित “राष्ट्र सेवा दला”ची स्थापना केली. सर्व जाती-धर्मातील तरुण-तरुणींना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली संध्याकाळच्या वेळी एकत्रित करून त्यांची शाखा भरवायची, त्यात कवायत, लेझीम, मैदानी खेळ, अभ्यासवर्ग असे कार्यक्रम घ्यायचे. अश्या शाखा महाराष्ट्रात आणि इतर उत्तर भारतीय राज्यांत ही सुरु झाल्या. या सोबत समाज जागृतीसाठी हुंडाबळी मोर्चे, अंधश्रद्धा निर्मुलन कार्य, श्रमदान शिबिरे, विनोबा भावेंच्या मार्गदर्शनाने सुरु झालेली भूदान चळवळ असे अनेक उपक्रम सुरु झाले. साने गुरुजी, नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, वसंत बापट अश्या समाजवादी नेत्यांनी राष्ट्र सेवा दलाची जडणघडण केली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळात ऐन भरात असलेली समाजवादी चळवळ १९९० च्या दशकानंतर मात्र खूपच रोडावत गेलेली आढळून येते. सध्याच्या काळात संपूर्ण देशभरात “राष्ट्र सेवा दलाच्या” केवळ १६३ नियमित शाखा लागतात, त्यातीलही १२३ शाखा फक्त महाराष्ट्रातच लागतात. समाजवादाचा प्रसार करणारे साहित्य निर्माण करणे आणि अजूनही अधिकतर महाराष्ट्रातच चाललेली काही सामाजिक कार्ये या स्वरुपात समाजवादी समाज कार्य आपले अस्तित्व टिकवून आहे.
१८६० साली प्रकाशित झालेल्या इंग्रज लेखक जॉन रस्किन च्या “अन टू द लास्ट” या पुस्तकावरून प्रेरणा घेऊन म. गांधीजींनी “सर्वोदय” विचाराधारेची मांडणी केली. गांधीजींच्या मृत्यूच्या नंतर लगेच मार्च १९४८ च्या काळात काही एकनिष्ठ गांधीवादी कार्यकर्त्यांनी सेवाग्राम मध्ये एकत्र येऊन सर्वोदयी चळवळीची, “सर्वोदय समाज” या नावाने स्थापना केली. १९५१ ते १९६० या काळात गांधीजींचे शिष्य विनोबा भावेंनी देशभरात जवळपास २५,००० किलोमीटर पदयात्रा करून सर्वोदयाला अभिप्रेत असलेली “भूदान” चळवळ सुरु केली. विनोबांच्या सोबत जयप्रकाश नारायण यांनीही सर्वोदयी विचारांनी भारून जाऊन बिहार मध्ये कार्य केलं. सर्वोदयी विचारांवर आधारित संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाची हाक जयप्रकाशजींनी दिली आणि त्यामुळे इंदिरा गांधींना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. या दोघा प्रभावशाली नेत्यांच्या सोबत दादा धर्माधिकारी, धीरेंद्र मुझुमदार, शंकरराव देव अश्या अनेक सर्वोदयी नेत्यांनी आपले आयुष्य या विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. वर्तमान काळात मात्र काही मोजकेच निष्ठावान सर्वोदयी कार्यकर्ते उरले आहेत. ते मात्र अजूनही उत्पन्नाची समानता, साधनशुद्धी, संघर्ष नव्हे सहकार, सत्ता आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण या सर्वोदयी तत्वांना अनुसरून प्रामाणिकपणे भारताच्या वेगवेगळ्या भागात समाजकार्य करीत आहेत. सर्वोदयी विचारांचे अस्तित्व त्यांच्यावरच टिकून आहे.
राष्ट्र सेवा दल, साम्यवादी पक्ष, हिंदुस्थानी सेवा मंडळ (कॉंग्रेस सेवा दल) यांच्या समकालीन सुरु झालेली अजून एक संघटना म्हणजे “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.” त्या वेळी कॉंग्रेसमध्ये सक्रियपणे कार्यरत असलेले नागपूरचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार कॉंग्रेसजनांच्या मुस्लीम लांगूलचालनाला कंटाळून हिंदूंचे लष्करीदृष्ट्या प्रशिक्षित एक देशव्यापी संघटन उभे करावे यासाठी अनेकांना भेटले. त्या चर्चेतून त्यांनी नागपूरला २७ सप्टेंबर, १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी काही समविचारी तरुण आणि लहान मुलांना सोबत घेऊन “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची” स्थापना केली. सुरुवातीच्या काळात संघटन मजबूत होण्यावर जास्त भर दिला गेला, त्यामुळे सुरुवातीची अनेक वर्षे “शाखा एके शाखा” हाच एकमेव उपक्रम संघाचा होता. त्यावेळी अनेक समाजवाद्यांनी आणि कॉंग्रेसवाल्यांनी “संघ तरुणांचे लोणचे घालणार आहे का” अशी हेटाळणी ही केली. परंतू योग्य संघटन झाल्याशिवाय समाजपरिवर्तन शक्य नाही, हे संघनिर्मात्यांनी विचार केल्याप्रमाणे, देशाच्या विविध राज्यांत अनेक तरुणांना पूर्णवेळ प्रचारक पाठवून त्या त्या राज्यांत संघटन मजबूत केले. स्वातंत्रोत्तर काळात गांधीहत्येच्या खोट्या आरोपाखाली संघावर बंदी आणली गेली. त्यानंतर आणीबाणीच्या काळातही संघबंदी लादली गेली. परंतू प्रत्येक संघबंदी नंतर संघाचे काम अधिकच विस्तारत गेल्याचे बघायला मिळाले. नंतरच्या काळात भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि विदेशातील ८० पेक्षा जास्त देशांमध्ये संघाचे कार्य वाढले. संघाच्या समविचारी अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ५० अखिल भारतीय स्तरावर तर २०० पेक्षा जास्त क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्था-संघटना आहेत. आजमितीस संघाच्या दैनंदिन ८५,००० नियमित शाखा देशभर लागतात. विवेकानंद केद्र, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, सेवाभारती या संघाच्या समविचारी संस्थांनी वनवासी भागात आणि ग्रामीण भागात चालविलेल्या सेवाकार्यांची संख्या देखील प्रचंड आहे. गेल्या काळात काश्मीर मधील ३७० कलम हटवणे, उत्तर पूर्वांचलच्या राज्यांमध्ये कमी झालेला उल्फा आणि आतंकवाद्यांचा प्रभाव, या सारख्या घटनांच्या मागे या सेवाकार्यांचा मोठा सहभाग आहे.
आजच्या आधुनिक काळात मोठ्या कंपनांचे सीएसआर (CSR), प्रोफेशनल सोशल सर्व्हिस अश्या नावांखाली समाजकार्याच्या नावावर स्वतःचे उखळ पांढरे करून घेणारेही अनेक लोक आणि संस्था आहेत, ज्या समाजातील निर्धन, अभावग्रस्त व्यक्तीच्या नावाने हजारो-लाखो रुपये अनुदान मिळवतात आणि त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या भल्यासाठीच करतात. गेल्या काही वर्षांत मात्र अश्या व्यक्ती आणि संस्थांचे ही पितळ उघडे पडले आणि समाजकार्य बदनाम होण्यापासून वाचले.
वर उल्लेख केलेल्या काही प्रमुख विचारधारांच्या व्यतिरिक्त स्व-प्रेरणेने आणि स्वयंस्फुर्तीने वर्षानुवर्ष समाजकार्य करणाऱ्या देखील अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत. ज्यांची कुठलीही वैचारिक बांधिलकी नाही, परंतू निस्वार्थ भावनेने आणि स्वतःच्या शक्तीप्रमाणे ते शांतपणे आपले कार्य करीत आहेत. बाबा आमटेंनी सुरु केलेले आणि विकास आणि प्रकाश आमटेंनी पुढे विकसित केलेले कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य असेल, गडचिरोलीत काम करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग आहेत. मेळघाटाच्या बैरागड परिसरात आरोग्यविषयक काम करणारे डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे असतील. अनाथांच्या साठी मोठे कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ आहेत, पाणी व्यवस्थापन विषयात कार्य करणारे राजस्थानचे जलपुरुष राजेंद्रसिंह आहेत, वृक्ष लागवड विषयात कार्य केलेले श्यामसुंदर पालीवाल आहेत. आपल्या विषयात वर्षानुवर्षे गाडून घेऊन समाजकार्य करणारे असे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांचा सगळ्यांचा उल्लेख देखील या लेखात करता येणे शक्य नाही. परंतू याच व्यक्ती आणि संस्था समाजात आवश्यक असलेल्या दीपस्तंभाची भूमिका शांतपणे परंतू ठामपणे आपले कार्य करीत बजावतांना दिसतात.