रावेर : आज नरेंद्र मोदी यांचा तिसरा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रपती भवनमद्ये जोरदार तयारी देखील सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये यंदा कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यामध्ये अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे. यामध्ये रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा देखील समावेश आहे. या संदर्भात भाजप नेतृत्वाकडून रक्षा खडसे यांना फोन देखील आला होता. यानंतर रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे डोळे पाणावले आहे.
एकनाथ खडसे हे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असलेले एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करायची आहे. अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नसला तरी त्यांनी देखील याबाबत दुजोरा दिला आहे. त्यांची सून खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटतं की गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचं श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ म्हणून तिला आज शपथविधीसाठी बोलावण्यात आलं आहे. साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली, याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळाली,” अशा भावना त्यांनी व्यक्त करत असताना नाथाभाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
इतका आनंद माझ्या जीवनात कधीही झाला नव्हता
पुढे त्यांना विचारण्यात आले की सून रक्षा खडसे बरोबर तुम्ही देखील दिल्लीला जाणार का? यावर उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, रक्षाताईंना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावण्यात आलं, त्यातच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला अश्रू आवरता आले नाहीत. इतका आनंद माझ्या जीवनात कधीही झाला नव्हता. केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणं ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे. मीही दिल्लीला जाणार आहे. दुपारी 3 वाजता मी दिल्लीला जाण्यासाठी निघेन” असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.