माढा : मला आव्हान देणाऱ्यांनी आधी वॉर्डातून निवडून येऊन दाखवावे आणि मग मी त्यावर प्रतिक्रिया देणे उचित ठरेल, असे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले. माढा तालुक्यातील खैराव येथे सीना नदीवरील पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी राजन पाटील हे उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात माजी आमदार राजन पाटील व पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील या दोघांत आव्हानाच्या शाब्दिक चकमकी सुरु आहेत. नुकतेच उमेश पाटील यांनी जनतेसमोर सत्तेचा माज चालत नाही. पक्षाला सोडुन आमदार निवडून आणा, असे थेट आव्हान पत्रकार परिषदेत राजन पाटील यांचे नाव न घेता उमेश पाटील यांनी दिले होते.
दरम्यान, उमेश पाटील यांच्या वक्तव्याविषयी खैराव येथे आलेल्या राजन पाटील यांना विचारले असता त्यांनी देखील उमेश पाटील यांच्यासह अन्य विद्यमान नगरसेवकाचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, आव्हान देणाऱ्यांनी अगोदर वॉर्डातून निवडुन येऊन दाखवावे आणि मग परत त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. जे आव्हान देत टीका करतात. त्यांना मीच तिकीट देऊन निवडून आणलंय. यापुढे तिकीट घेऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देखील नाव न घेता उमेश पाटील यांना केले.
तिन्ही लोक (माणसं) आमच्यासोबत पहिल्यापासून नाहीत. ते मुद्दाम आले आहेत. हे लोक मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीत ढवळाढवळ करु शकत नाहीत. कोणी आव्हान दिलं म्हणून त्यावर प्रति उत्तर देत बसलो तर लोक मला जोड्याने मारतील. ‘कोणाच्या नादी लागलात’ असं म्हणतील.