डॉ. शिवाजी काळगे (टीम नवराष्ट्र)
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच होईल असे वाटत होते. मात्र महाविकास आघाडीला राज्यात मोठा फायदा झाला. काँग्रेसने देखील मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यात लातूरची जागा काँग्रेसने जिंकली. डॉ. शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले. मात्र डॉ. काळगे निवडून आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात हायकोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आता मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ. शिवाजी काळगे यांना या प्रकरणात नोटीस धाडली आहे.
खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे. डॉ. शिवाजी काळगे यांनी जात प्रमाणपत्राच्या कागदपात्रांची पूर्तता करावी अशी नोटीस हायकोर्टाने दिली आहे. येत्या २ सप्टेंबर पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याची नोटीस मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावली आहे.
नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी १९८६ साली जात वैधता प्रमाणपत्र काढले होते. दरम्यान औरंगाबादच्या आयुक्तांनी ते रद्द केल्याचे समजते आहे. तसेच शिवाजी काळगे यांना जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील त्यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याचे माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे.
यंदाची लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मागील सलग दोन वेळेस या ठिकाणी भाजपने मोठा विजय मिळवला होता. तिसऱ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र यावेळेस काँग्रेसने विजय खेचून आणला. लातूर लोकसभा मतदारसंघात डॉ.शिवाजी काळगे हे ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र आता त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हायकोर्टाचा काय निकाल येतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.