मराठा आरक्षणासाठी मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण यांनी पुण्यातून मुंबईमध्ये जेवण पाठवले (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये तापला आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. मुंबईमध्ये हजारो मराठा बांधव जमले आहेत. मात्र सरकारकडून खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मराठा बांधवांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांचा मुंबईमधील तिसरा दिवस असल्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची सोयीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण मैदानात उतरले आहेत. त्यांनी पुण्यातून मराठा बांधवांसाठी जेवण पाठवले आहे..
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर ठिय्या देऊन बसले आहेत. त्या सर्व आंदोलनकर्त्या बांधवाची गैरसोय होऊ नये,त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मावळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड हाजी गफुर पठाण यांनी महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (स.) जेवण व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य सामग्री मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. त्यावेळी ‘एक मराठा,लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी…छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा अॅड हाजी गफूर पठाण मैदानात…! या आशयाचा मजकूर असलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मराठा बांधवांसाठी हाजी गफूर पठाण यांनी मायेचा घास पाठवला आहे. मराठा बांधवांची मुंबईमध्ये खाण्याची गैरसोय होत असल्यामुळे हाजी गफूर पठाण यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरु केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत माहिती देताना अॅड हाजी गफूर पठाण म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावं,या मागणीसाठी कित्येक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत.आता मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करत आहे.त्या आंदोलनामध्ये हजारो संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. त्या बांधवासाठी महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (स.) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे.ते लक्षात घेऊन कोंढवा कौसरबाग येथील नागरिकांच्या माध्यमातून तेथील बांधवांसाठी जेवण व्यवस्था केली आहे.आम्हा सर्व मुस्लिम बांधवांचा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी एक मावळा आहे.त्यामुळे मराठा बांधवासाठी एक खारीचा वाटा म्हणून जेवणाची व्यवस्था करीत असल्याच्या भावना हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केल्या आहेत.