जळगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. पण, आता शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन एकच गाडीमधून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जळगावमधील बोदवड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता बोदवडमध्ये शिवसेना भाजपाची छुपी युती असल्याची चर्चा रंगली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप सेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगत असताना दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायतीमध्ये होमपीचवर सेनेने धक्का दिला होता. बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले.यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.
गिरीश महाजन हे विविध मुद्यावर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी काही कार्यकर्ते महाजन यांच्या घरी पोहोचले होते. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केला. गिरीश महाजन यांनी हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. “बोदवड नगरपंचायतीच्या निकालाबाबत एकनाथ खडसे यांना काही म्हणू द्या. खडसे विधानसभा निवडणुकीत पडले, आता बोदवड हारले, खरंतर ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते”, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.