सालेकसा : राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. मात्र, याचा कसलाही विचार राज्य सरकारने केला नाही. त्यामुळे, या विरोधात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीतर्फे १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
[read_also content=”गोंदिया कुणी हिरावला होमगार्ड यांचा रोजगार ? पुर्ववत कामावर रूजू करून घ्या : होमगार्ड महासंघाची मागणी https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/who-hired-a-homeguard-return-to-work-demand-from-homeguard-federation-nraa-232627.html”]
राज्यातील ३६ जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे संघटन आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवून याचा जाहीर विरोध दर्शविला आहे. लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्या संबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, राज्य सरकारने एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीही उत्तर देत नाहीत. तोच प्रकार आता राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घेता वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन करू, या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माधव तरोणे, मुकेश शक्तीमारे, मयूर गावडे, विशाल माहुले, यशवंत शेंडे, राजेश फुले, सुनील बारापात्रे यांचा समावेश होता.