कोल्हापूर : ऐतिहासिक पन्हाळगडाचे प्रवेशद्वार प्रवासी कर नाका येथे अतिवृष्टीने भूस्खलन होत गडाचा मुख्य रस्ता खचून येथील तट बंदीला मोठे भगदाड पडले. २७५ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. गडावरील लोक अडकून पडले आहेत. असाच पावसाचा जोर राहिल्यास येथील गडाला मोठी भूस्खलनाची शक्यता आहे. सकाळी साडेसहा वाजता भूस्खलन दुर्घटना घडली. वाहतूक नसल्याने जीवितहानी टाळली.
सलग तीन वर्षांपासून पन्हाळगडाला भूस्खलन होत आहे. आत्तापर्यंत घडलेले भूस्खलन झालेली हानी नुकतेच काम पूर्ण होऊन काही महिन्यांपासून रस्ता वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, आज झालेल्या भूस्खलनाने मोठी हानी झाली असून, येथील हा रस्ता पूर्ववत होईल का नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. भूस्खलनाने पन्हाळगडाचा मुख्य रास्ता खचल्याने गडावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
येथील तटबंदीला व तलाव आणि परिसराला मोठा धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी काही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खचलेला भाग मंगळवार पेठ दिशेने सुमारे दोन हजार फूट खाली कोसळला आहे. येथील पाणी मंगळवार पेठ येथील लोकांच्या घरात घुसून मोठे नुकसान झाले. येथील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पन्हाळा शहरासह आजूबाजूच्या आठ ते दहा गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर बुधवार पेठ येथे बरकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.
शिवा काशीद समाधीस्थळी भूस्खलन घटना घडत आहे. तसेच पावनगड तटबंदीतूनही भूस्खलन घडत असून, पडझड सुरुच आहे. तसेच मसाई पठार म्हाळुंगेला जाणारा रस्ता भूस्खलनाने खचला आहे. येथील परिसराला मोठा धोका संभावत आहे.