पंढरपूर / राजेंद्र काळे : माघी शुध्द जया एकादशीनिमित्त (Maghi Yatra Pandharpur) मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणी मातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. माघी एकादशी निमित्त मंदिरात विविध फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती जरबेरा अशा विविध जातींच्या एकूण एक टन फुलांची आरास करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर समितीच्या दिनदर्शिकेचे व डायरीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुशास्त्री भगरे, शकुतंला नडगिरे, माधवी निगडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
माघी एकादशीला राज्यातील इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व मंदीर समितीच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क बंधनकारक केले असून, रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधेबरोबरच ६५ एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठह कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
माघी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. एकादशी निमित्त दुपारपर्यंत दर्शन रांग पत्राशेड पुढे पोहचली होती. दर्शन रांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मुखदर्शनासाठी सुमारे सहा ते सात तास वेळ लागत आहे. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, ६५ एकर भाविकांसह टाळ मृदूंगाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.