माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असून, या निवडणुकीत स्वतः सहभागी होणार आहोत,” अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात गुरुवारी (२२ मे) त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “या निवडणुकीसाठी माझ्या पॅनेलमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच नाही, तर जे संचालकपदासाठी पात्र आहेत, अशा सर्वच उमेदवारांना संधी दिली जाणार आहे,” असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “१३ जून रोजी प्रचाराचा अधिकृत प्रारंभ होणार असून, त्याच दिवशी कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. मी स्वतःही या निवडणुकीत उतरणार आहे. काय होतयं ते एकदा मलाही पाहायचंच आहे!” या निवेदनामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली असून, येत्या काळात या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, “माझ्या हातात जे जे आहे, त्या सर्वच यंत्रणांचा वापर करून मी ही निवडणूक लढवणार आहे,” असही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
Vaishnavi Hagwane: वैष्णवी मृत्यू प्रकरण; CM फडणवीसांच्या ‘या’ वक्तव्याने आरोपींचे धाबे दणाणले
“माझ्या पॅनेलमध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नाही, तर जे संचालक होण्यासाठी पात्र असतील, असे योग्य उमेदवार असतील. यावेळी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे,” असेही पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, “या निवडणुकीत मी स्वतःही उभा राहणार आहे. मलाही बघायचंच आहे की काय होतंय ते!” असे म्हणत त्यांनी निवडणुकीला प्रतिष्ठेचे स्वरूप दिले आहे.
अजित पवार म्हणाले, “अध्यक्ष आणि संचालकांना चुकीचे काम करू दिलं जाणार नाही. संचालकांनी कारखान्याची गाडी वापरू नये. ज्यांना हे नियम पचणार नाहीत, त्यांनी पॅनेलमध्ये येऊच नये. काहीजण माझ्या नावाने उद्योग करतात आणि बदनामी माझी होते, त्यामुळे यापुढे मी स्वतः बारकाईने लक्ष ठेवणार आहे,” असा इशारा दिला.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विकासावर भर देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. “सीएसआरच्या माध्यमातून विकासकामांना चालना दिली जाईल,” असे सांगत त्यांनी कारखान्याच्या सामाजिक दायित्वाच्या भूमिकेचीही स्पष्टता केली. या सर्व घोषणांमुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय रंगत आणि चुरस मोठ्या प्रमाणावर वाढणार हे निश्चित झाले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एकूण ८१ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १२ अर्ज, तर गुरुवारी (२२ मे) ६९ अर्ज दाखल झाले. बारामती व पणदरे या गटांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सांगवी गटातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, तसेच इतर विविध संघटनांतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी दाखल करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये राजेंद्र बुरुंगले, श्रीहरी येळे, अशोकराव सस्ते, प्रवीण वाघमोडे, अरविंद बनसोडे, विनोद जगताप, नारायण कोकरे, कुलभूषण कोकरे, अमित जगताप, अभय जगताप, विक्रम कोकरे, रामदास आटोळे, विलास सस्ते, मिथुन आटोळे आदींचा समावेश आहे.
नीरावागज गटातूनही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, अविनाश देवकाते, राजेश देवकाते, गणपत देवकाते, विठ्ठलराव देवकाते, तुकाराम गावडे, गुलाबराव गावडे, दिलीप ढवाण, भालचंद्र देवकाते (नीरावागज), जवाहर इंगुले (बारामती), बापूराव गायकवाड (सोनकसवाडी), उज्ज्वला कोकरे, गीतांजली जगताप, राजेश्री कोकरे, राणी देवकाते, रवींद्र थोरात (शारदानगर), रामचंद्र नाळे, भरत बनकर (उंडवडी) यांचा समावेश आहे. एकूण अर्जांच्या संख्येवरून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील टप्प्यात अर्ज छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.