मंत्री आशीष शेलार (फोटो- सोशल मीडिया)
1. महाराष्ट्र हे जगातील डिजिटल प्रगतीशील राष्ट्रासाठी आदर्श
2. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्राने घेतली आघाडी
3. ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या मोहिमेचे उद्घाटन
मुंबई: डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र हे जगातील डिजिटल प्रगतीशील राष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत आयोजित ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या मोहिमेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे आज करण्यात आले.
यावेळी मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, २०१६ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र सायबर विभागाच्या प्रयत्नांबरोबरच राज्याने ‘गोल्डन डेटा प्रकल्प’ सुरू केला आहे. या प्रकल्पात १२ कोटी प्रमाणित नागरिकांची माहिती नोंदवली असून, नागरिकांना प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळे पासवर्ड किंवा प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही. हा प्रकल्प सायबर सुरक्षेसाठी एक मोठे बळ ठरणार आहे.
सायबर सुरक्षा ही केवळ शहरी भागापुरती मर्यादित नसून ग्रामीण व निम्न-शहरी भागातील नागरिकांनाही याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था व शासनाने मिळून यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे डिजिटल रेजिलियन्स सिस्टीम उभारण्याची ही योग्य वेळ आहे. उद्योग क्षेत्राने गुंतवणूक करावी, शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम तयार करावेत आणि शासनाने सक्षम व्यवस्था उभारावी, तसेच नागरिकांनी स्वतः जागरूक होणे आवश्यक असल्याचे मत मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केले.
मंत्री आशिष शेलार यांच्या नव्या घोषणेने महाराष्ट्रातील सिनेमा व्यवसायावर मोठा परिणाम होणार
आजच्या काळात सीमारेषांवरील सुरक्षा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच डिजिटल व्यवहार, ई-गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील सायबर सुरक्षा महत्त्वाची ठरली आहे. भारतात ७० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असून १२० कोटी मोबाईलधारक आहेत. गेल्या पाच वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ४०० टक्के वाढ झाली आहे, ही गंभीर बाब आहे. आपल्या देशात दर मिनिटाला सरासरी ७०२ सायबर धोक्यांची नोंद होत असून, प्रत्येक सेकंदाला १२ नवीन सायबर हल्ल्यांचा धोका समोर येतो. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी सक्षम व टिकाऊ सायबर सुरक्षा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
सायबर कोविडपासून बचावासाठी सायबर स्वच्छतेची गरज – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
सायबर सुरक्षा ही केवळ संस्थांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सायबर कोविडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर स्वच्छतेचा अवलंब करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
एआयच्या युगात डेटा सर्वात मौल्यवान ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला डेटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. अति-सामायिकरण टाळणे, समाज माध्यमांवर जास्त माहिती न टाकणे, तसेच ‘जिओस्पाय’सारख्या अल्गोरिदमपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. या कार्यक्रमात सेबीचे कार्यकारी संचालक अविनाश पांडे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.