केळघर : केळघर परिसरात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या परिसरातील रहिवाशांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
वाहिटे ता . जावली येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले आहे. त्याबरोबरच परिसरातील बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, केडंबे, पुनवडी, डांगरेघर, केळघरसह अनेक गावांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. प्रचंड अतिवृष्टीने वेण्णा नदीपागला पूर आला. नदीकाठची संपूर्ण जमीन पुराने वाहून गेली. तर परिसरातील पूलही वाहून गेले आहेत. लाईटचे खांब तुटून गेले. परिसरात लाईट नाही. जनजीवन विस्कळीतही झाले आहे. परिसरातील जवळपास प्रत्येक कुटुंब बाधित झाले आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर शेतीचे नुकसान भरून निघणार नाही. तर शासनाच्या वतीने मशनरी उपलब्ध करून शेतीची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सागर धनावडे, मोहनराव कासुर्डे, बबन बेलोशे, संतोष कासुर्डे, शुभाष शेलार, सर्जेराव खुटेकर यांच्यासह वाहिटे ग्रामस्थ उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुडघाभर चिखलातून जाऊन परिसरालीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीसह परिसरात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.