सातारा : अनेक पर्वत आणि शिखरं यशस्वीपणे सर करून सातारची कन्या प्रियांका मोहिते हिने नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आज तिला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर झाला आहे. ही सातरकरांसाठी अभिमानाची बाब असून, प्रियांका मोहिते हिने आपल्या साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे, असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
साताऱ्याची शिखर कन्या अशी ख्याती मिळवलेल्या प्रियांका मोहिते हिला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड जाहीर झाला आहे. अतिउच्च अन्नपूर्णा शिखर सर केल्यानंतर तिला हा पुरस्कार जाहीर झाला असून, 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान केला जाणार आहे. या यशाबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
केवळ हॉबी म्हणून नव्हे तर पॅशन म्हणून अनेक शिखरे आणि पर्वत सर करणाऱ्या प्रियंकाला अर्जुन अवॉर्ड सारखा मिळाला असून, त्यामुळे साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाला म्हणून ती थांबणारी नाहीये तर तिची नवीन यादी तयार असेल आणि आगामी काळात ती यादीत नमूद सर्व शिखरे पदांक्रांत करेल अशा शुभेच्छा सातारकरांच्या वतीने देतो, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रियांकाचे कौतुक केले.
पुरस्कार मिळण्याने खूपच आनंद झाला असून, आणखी मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा आणि बळ मिळाले आहे. यापुढेही आपल्या साताऱ्याचे नाव आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास प्रियांका मोहिते हिने व्यक्त केला.