प्रतिकात्मक फोटो
मुंबई (Mumbai). कोरोनाची पहिली लाट आणि आता आलेल्या दुसर्या लाटेमध्ये राज्यातील 25 हजार शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना कोविड कामाला जुंपण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय अनेक शिक्षक डॉक्टरांसोबत काम करत आहेत.
[read_also content=”नागपूर जिल्हा प्रशासनाचे हायटेक पाऊल/ औषधे आणि ऑक्सिजनची काळाबाजारी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केली अद्ययावत वेबसाईट https://www.navarashtra.com/latest-news/hi-tech-step-of-nagpur-district-administration-updated-website-launched-to-curb-blackmail-of-drugs-and-oxygen-nrat-129350.html”]
एकीकडे शिक्षकांकडून फ्रंटलाईन वर्करची कामे करवून घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांना लस देण्यासाठी प्राधान्यही दिले जात नसल्याने शिक्षका मध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 हजारांहून अधिक कोरोना ड्युटीवरील शिक्षक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यातील कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील शिक्षकांना डॉक्टरांसोबत रुग्णालयात ड्युटी लावण्यात आली आहे. डॉक्टरांसह अन्य वैद्यकिय कर्मचार्यांना पीपीई किट उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्यासोबत काम करणार्या शिक्षकांना सुरक्षेची कोणतीही साधने दिली जात नाहीत. शिक्षक पीपीई किटशिवायच रुग्णालयात काम करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांना चतुर्थ श्रेणीची कामे दिल्याने शिक्षक आरोग्य सेवकाची कामे करत आहेत.
त्याचप्रमाणे रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजणे, घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटी देऊन सेल्फी काढणे, शिधावाटप दुकान, घरोघरी भेट देणे, नाकाबंदीच्या कामामध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अशी कामे अनेक जिल्ह्यात शिक्षकांना दिली आहे. त्याचबरोबर कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचीही जबाबदारी देण्यात येत आहे. त्यामुळे कामे करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सोलापूरमध्ये कोरोना ड्युटीवर असलेल्या तीन शिक्षकांचा मृत्यू झाला तर नगर जिल्ह्यातही २ शिक्षकांचा मृत्यू झाला. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणार्या शिक्षकांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. विमाकवच लागू केलेले नाही. लसीकरण पूर्ण केलेले नाही. तरीही शिक्षक वर्ग अशा वाईट परिस्थितीत काम करत आहे. त्यामुळे शिक्षकांना जिवाची भीती वाटत आहे. शासनाच्या अन्य विभागातील कर्मचारी १५ टक्के उपस्थिती असताना हक्काची उन्हाळी सुट्टी असतानाही शिक्षकांनाच कामाला जुंपण्यात आले आहे.
त्यामुळे एकीकडे फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षकांकडून कामे करवून घेण्यात येत आहेत, तर दुसरीकडे त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करण्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 हजार शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणेच लसीकरणास प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.






