तासगाव-कवठेमहाकाळचे आमदार रोहित पाटील (फोटो- ट्विटर)
तासगाव/ मिलिंद पोळ: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २७, ६४४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे ‘तासगाव – कवठेमहांकाळ’ मतदारसंघात रोहित पाटीलच ‘दादा’ असल्याचे सिद्ध झाले आहे. तर संजय पाटील यांना लोकसभेनंतर विधानसभेलाही मतदारांनी नाकारले. आर. आर. पाटील घराण्याविरोधात विजय मिळवण्याचे त्यांचे ३५ वर्षांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. रोहितच्या या विजयानंतर मतदारसंघात ‘आर. आर. पार्ट – २’ सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. याठिकाणी स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजिव रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील आमने – सामने आले होते. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही गटातील संघर्ष कुठंतरी कमी झाल्याचे पहायला मिळाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही घराण्यातील संघर्ष उफाळून आला होता. दरम्यान निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांनी टोकाचा प्रचार केला. एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, येथील तहसील कार्यालयाच्या बहुउद्देशियल हॉलमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. एकून २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. सुरुवातीस पोस्टल मतदान मोजण्यात आले. त्यानंतर मतमोजणी यंत्राद्वारे मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीची दोन्ही गटांना उत्सुकता लागली होती. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून रोहित पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. माजी खासदार संजय पाटील यांचे चिंचणी हे गाव व भैरववाडी तसेच जुळेवाडी वगळता तासगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये रोहित पाटील यांची आघाडी कायम राहिली. तासगाव तालुक्यातील आठवी फेरी सोडली तर जवळपास सर्वच फेऱ्यांमध्ये राहित पाटील आघाडीवर राहिले.
विजय निश्चित झाल्यानंतर रोहित पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. रोहित यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. आ. सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या भगिनी स्मिता पाटील याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, दुपारनंतर रोहित पाटील मतमोजणी केंद्रावर आले. त्यांच्यासोबत आमदार सुमन पाटील, स्मिता पाटील उपस्थित होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी रोहित पाटील यांना प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदारसंघातील गावागावात जल्लोष सुरू होता.
हेही वाचा: सांगलीकरांनी महाराष्ट्राला दिला सर्वात तरुण आमदार; पहिल्याच निवडणुकीत मिळवली सव्वा लाख मतं
एक मत दोन आमदार घोषणा हवेतच
येळावी, मणेराजुरी, कवठेएकंद, सावळज, कुमठे, सावर्डे, वायफळे यासह अन्य राजकीयदृष्ठ्या संवेदनशिल गावांमध्ये संजय पाटील यांना पिछाडीवर रहावे लागले. होमग्राउंडवर संजय पाटील यांना मतदारांनी झिडकारल्याने सुरुवातीपासून त्यांची वाटचाल पराभवाकडे होती. हक्काच्या गावांमध्ये मतदारांनी त्यांना नाकारल्याने पाटील यांचा पराभव गडद होऊ लागला होता.
कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांच्या हातात हात घालून काम केले. मात्र घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनीहीत्यांचे ऐकले नसल्याचे दिसून आहे. ‘एक मत, दोन आमदार’ ही घोषणा हवेत विरल्याचे दिसले. कवठेमहांकाळमधील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांमध्ये संजय पाटील यांना आघाडी मिळाली. तर बहुतांशी गावांमध्ये रोहित पाटील यांना मतदारांनी पसंदी दिल्याचे दिसून आहे. निवडणुकीत राहित पाटील यांना १ लाख २८ हजार ४०३ मते मिळाली. तर संजय पाटील यांना १ लाख ७५९ मते मिळाली.
गुंडगिरी मोडून काढणार : आ. रोहित पाटील
आ. रोहित पाटील म्हणाले, तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य व अवैध कारभार मी चालू देणार नाही. चालला तर त्यावर योग्य पद्धतीने आवाज उठवत मी कायद्याच्या माध्यमातून गुंडगिरी मोडून करणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यात तासगाव कवठेमंकाळ मतदार संघात विविध विकासकामे व एमआयडीसीसाठी चांगल्या कंपन्या कशा येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. साडेतीन हजार बोगस मतदान टाकूनही तासगाव शहरातल्या लोकांनी अडीच हजारांचे लीड मला दिले. सर्वजण एकत्र येऊनही जनता माझ्या सोबत होती त्यांचा ऋणी आहे.
लोकांचा विश्वास रोहित सार्थकी लावेल : स्मिता पाटील
तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील जनतेने आबा कुटुंबीयांवर कायम प्रेम केले आहे. रोहितच्या रूपाने या मतदारसंघाने पुन्हा आमच्यावर विश्वास टाकला. आबांच्या पावलावर पाऊल टाकतच रोहित ही या मतदारसंघाचा चांगला विकास करेल. व आमच्या कुटुंबावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवेल अशी प्रतिक्रिया स्मिता पाटील यांनी दिली.
जनतेचे विकासाला मत : सुमनताई पाटील
स्वर्गीय आर आर आबा पाटील व मी केलेल्या विकास कामाच्या बळावर रोहित यांना तासगाव व कवठेमहांकाळच्या जनतेने भरभरून मतदान दिले. त्याबद्दल आम्ही या मतदारसंघाच्या जनतेचे ऋणी आहोत. विकास कामांचा वारसा आर आर आबांप्रमाणेच रोहित पुढे चालवून चांगले काम करेल असा विश्वास आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केला.
जनतेचा कौल मान्य : संजयकाका पाटील
विधानसभा निवडणुकीत विकासाचे राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली. तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. केंद्रात व राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करूया. कोणताही अनुचित प्रकार आपल्याकडून घडू नये याची काळजी घ्या अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली.