मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहार तहसीलमधील कान्हा नॅशनल पार्कला लागून असलेल्या मलाखेडी गावात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास दोन गावकऱ्यांची हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्रकेही फेकली. पोलिसांना माहिती देणाऱ्यांचाही हाच निकाल लागेल, असे त्यात लिहिले आहे. पत्रात पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे.
या हल्ल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मालाखेडी गावात नक्षलवाद्यांनी पुन्हा भ्याड कृत्य केले आहे. दोन निष्पाप गावकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याने नक्षलवाद्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. याचा आमच्या मोहिमेवर परिणाम होणार नाही. नक्षलवादी हिंसाचार संपवण्याची आमची मोहीम पूर्ण जोमाने सुरू राहील. मी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांचा C-60 कमांडर सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाखांचे बक्षीस असलेल्या मंगरू मांडवी या नक्षलवाद्यालाही येथून अटक केली होती. नक्षलवादी मंगरू यांच्यावर खून, पोलिसांवर हल्ला असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बालाघाट येथील नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गावकऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.