सातारा : जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीने अकरा जागा बिनविरोध करत वर्चस्वाचा झेंडा रोवला. मात्र, सत्तासमीकरणाची राजकीय समीकरणे वैयक्तिक इर्षा पातळीवर पोहोचल्याने काँग्रेस व शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादीने सामावून घेतले नाही. परिणामी, महाविकास आघाडीची स्थानिक पातळीवरची राजकीय गणिते बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची अतिमहत्वाकांक्षा आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे दुर्लक्ष नडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा बँकेत राबवावा, अशी अपेक्षा काँग्रेस व शिवसेनेची होती. मात्र, प्रत्यक्षात कराड सोसायटी मतदारसंघावर मजबूत दावेदारी सांगून तो मतदारसंघ माजी आमदार दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह यांनाच मिळावा. हे राष्ट्रवादीकडून वदवून घेण्यात काँग्रेसचे नेते कमी पडले. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची एकसंघ ताकत उदयसिंह यांच्यामागे उभी करून दबाव निर्माण करायला हवा होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. मात्र, विलासकाकांची सोसायटी मतदारसंघातील मजबूत बांधणी हा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
नागरी बँकांचा सेफ झोन पालकमंत्र्यांनी निवडला असता तर ते बिनविरोध झाले असते. मात्र, सोसायटी मतदारसंघातूनच जिल्हा बँकेत दाखल व्हायचे बाळासाहेबांचे मनसुबे पुढे राजकीय हाराकिरी ठरू नये. त्यामुळे उदयसिंह पाटील विरूध्द बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. जावली तालुक्यात थेट उपमुख्यमंत्री यांचे नाव घेऊन दंड थोपटणारे ज्ञानदेव रांजणे बहुमत देणारे पस्तीस सभासद घेऊन राजस्थानला गेल्याने आमदार शशिकांत शिंदे अडचणीत आले आहेत.