Kane Williamson Resigns : अनुभवी किवी खेळाडू केन विल्यमसनने बुधवारी म्हणजेच १९ जून रोजी न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का दिला आहे. त्याने सांगितले की 2024-25 हंगामासाठी तो नवीन केंद्रीय करार घेणार नाही. विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेटकडून खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याने कर्णधारपदही सोडले आहे. 33 वर्षीय विल्यमसन न्यूझीलंडच्या उन्हाळ्यात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तो या कालावधीत न्यूझीलंडकडून खेळू शकणार नाही. त्याशिवाय तो न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी नेहमी तयार असेल असेही त्याने म्हटले आहे.
याच कारणामुळे विल्यमसनने केंद्रीय करार नाकारला
केन विल्यमसन म्हणाला की तो न्यूझीलंडच्या उन्हाळी हंगामात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे, ज्यामुळे तो न्यूझीलंडचा केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. याशिवाय, त्याने असेही सांगितले की त्याला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.
काय म्हटलाय केन आपल्या पत्रात वाचा
केन विल्यमसन म्हणाला, ‘मला संघाच्या प्रगतीसाठी प्रत्येक प्रकारे मदत करण्याची खूप आवड आहे आणि त्यात योगदान देत राहायचे आहे. पण मी न्यूझीलंडच्या उन्हाळ्यात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे त्यामुळे मी केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. न्यूझीलंडकडून खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि संघासाठी काही करण्याची माझी इच्छा कमी झालेली नाही. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे जीवन बदलले आहे आणि माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे आणि त्यांच्यासोबत देश किंवा परदेशात प्रवास करणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे झाले आहे.
केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
33 वर्षीय केन विल्यमसनने 2010 पासून न्यूझीलंडकडून 100 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 93 टी-20 सामने खेळले आहेत. विल्यमसनच्या नावावर कसोटीत 8743, एकदिवसीयमध्ये 6810 आणि टी-20मध्ये 2575 धावा आहेत. याशिवाय तो कधीकधी गोलंदाजी करतानाही दिसतो. विल्यमसन हा उजवा हात ऑफ स्पिनर आहे. त्याने टेस्टमध्ये 30, एकदिवसीयमध्ये 37 आणि टी-20मध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.






