वाहनचालकाची सुरक्षा ही सर्वोतोपरी असते. दुचाकी चालवताना हेल्मेट असणे सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. या हेल्मेट सक्तीकरता शासनाकडून अनेक नियमही करण्यात आले आहे. मात्र तरीही हेल्मेट परिधान करण्यास काही जण गाभीर्याने घेत नाही आणि स्वत:चा जीव गमावून बसतात. हेल्मेट हे प्रत्येकासाठी जीवरक्षकाचे कार्य करते त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दुचाकी चालवताना हेल्मेट हे नियमांपेक्षा स्वसुरक्षेसाठी घालावे. या हेल्मेटबाबतच केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
बुधवारी ( दि. ४ सप्टेंबर) दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की दुचाकी उत्पादकांनी वाहन खरेदी करणाऱ्याला सवलतीत किंवा वाजवी दरात हेल्मेट द्यावे. केवळ हेल्मेट न घातल्याने अनेक लोक अपघातात मृत्युमुखी पडतात, “मी दुचाकी उत्पादकांना विनंती करण्याचा विचार करत आहे… त्यांनी वाहन खरेदी करणाऱ्यांना हेल्मेटवर काही वाजवी सवलत दिली तर आपण लोकांचे प्राण वाचवू शकू,” असे गडकरी म्हणाले.
शालेय बस पार्किंग, ड्रायव्हिंग स्कूल
शालेय बसेसच्या पार्किंगच्या व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या गरजेवरही रस्ते वाहतूक गडकरींनी भर दिला. भारतातील प्रत्येक तालुक्यात ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचे गडकरी म्हणाले.मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 ने वाहतूक गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात दंड लागू केला आहे, असे नमूद करून ते म्हणाले, परंतु प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी हेही मोठे आव्हान आहे.
43 टक्क्यांहून अधिक मृत्यूचे प्रमुख कारण हे अतिवेग
आरोग्य मंत्रालयाने संकलित केलेल्या “नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर प्रिव्हेंशन ऑफ अनइनटेंशनल इंजरी” (National Strategy for Prevention of Unintentional Injury) या शीर्षकाच्या नवीन अहवालानुसार, भारतातील अनावधानाने झालेल्या दुखापतींमुळे सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातांत होतात, अशा मृत्यूंपैकी 43 टक्क्यांहून अधिक मृत्यूचे प्रमुख कारण हे अतिवेगाने वाहन चालविणे असते.
रस्त्यावरील वाहतूक अपघात हे सर्वाधिक
“2022 मध्ये भारतात अनावधानाने झालेल्या दुखापतींमुळे 4,30,504 मृत्यू आणि 1,70,924 मृत्यू हे हेतुपुरस्सर झालेल्या दुखापतींमुळे झाले होते. 2016 ते 2022 पर्यंत, अनावधानाने आणि हेतुपुरस्सर झालेल्या दुखापतींमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. रस्त्यावरील वाहतूक अपघात हे सर्वाधिक आहेत. अनावधानाने झालेल्या दुखापतींचे कारण (43.7 टक्के),” अहवालात म्हटले होते.