पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनामुळे बंद पडलेला व्यवसाय…त्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती अन त्यातच मुलांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील वृध्दाचा बेवारस अवस्थेत मृत्यू झाला. पारनेर बसस्थानकावरील चौकात इस्त्रीचा व्यवसाय करणारे सोमनाथ कुऱ्हाडे यांचा व्यवसाय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत बंद पडला. त्यातच अतीक्रमणात असलेली त्यांची टपरी महसूल विभागाने काढून टाकली.
व्यवसायाला जागा राहिली नसल्याने कुऱ्हाडे यांनी घरोघरी जाऊन कपडे गोळा करून इस्त्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृध्दावस्थेत ते काम जिकीरीचे होते. त्यामुळे व्यवसाय फारसा होत नव्हता. त्यातून उपासमार होऊ लागल्याने ते कामानिमित्त कल्याण येथे राहात असलेल्या मुलाकडे गेले. मात्र तेथेही चांगली वागणूक न मिळाल्याने कुऱ्हाडे परत पारनेरला आले.
सुपे औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करणाऱ्या हंगे येथे वास्तव्यास असलेल्या मुलाकडे राहण्यास गेले. मात्र त्यानेही या वृद्ध पित्याला थारा दिला नाही. त्याने थकलेल्या पित्याला पारनेर बसस्थानकावर आणून सोडले.
उपासमार व वृध्दत्वामुळे गलितगात
उपासमार व वृध्दत्वामुळे गलितगात्र झालेले कुऱ्हाडे दोन दिवस बसस्थानकावरील एका कोपऱ्यात पडून होते. बसस्थानकावर फारशी वर्दळ नसल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र तिसऱ्या दिवशी (दि. २६ अाॅक्टोबर) टाकळी ढोकेश्वर येथील आनंद सिंधू वृध्दाश्रमाचे संस्थापक विलास महाराज लोंढे यांना पारनेर बसस्थानकावर बेवारस अवस्थेत वृध्द व्यक्ती पडली असल्याचे समजले. त्यांनी तातडीने कुऱ्हाडे यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत मुलांना कळविले. मात्र मुलांनी प्रतिसाद दिला नाही. कोणीही रुग्णालयाकडे फिरकले नाहीत.
गंभीर आजारी असलेल्या कुऱ्हाडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात नुकतेच रूजू झालेले डॉ. पवन भावटे यांनी आत्मियतेने उपचार केले. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांना जेवण जाऊ लागले. मात्र उपचारापूर्वी उपासमार झालेली असल्याने त्यांना अतीसाराचा त्रास सुरू झाला. त्यातच उपचार सुरू असताना १ नोव्हेंबर रोजी कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाला.
समाज माध्यमातून आवाहन
संपर्क साधूनही कुऱ्हाडे यांची मुले प्रतिसाद देत नसल्याने विलास महाराज लोंढे यांनी, मुलांनी अंत्यविधीला उपस्थित रहावे असे आवाहन समाज माध्यमातून केले. त्यानंतर कुऱ्हाडे यांचा मुलगा ग्रामीण रुग्णालयात आला. त्याने मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.