पुणे : राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या (Health Department) पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने एका तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तत्पुर्वी आता या पेपर फुटीप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विजय प्रल्हाद मुराडे (वय २९, रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दिली आहे.
राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी ‘ड’ संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर वेळेपुर्वीच फुटला होता. सकाळी साडेआठ वाजताच पेपर व्हायरल झाला होता. एका कागदावर पेनाने प्रश्न व उत्तरे लिहिलेला पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. ९२ मार्कचे प्रश्न सोडविण्यात आले होते. त्यामुळे पेपर फुटल्याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु, त्याबाबत आरोग्य विभागाकडून काहीही माहिती न दिल्याने तेव्हा गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, नुकतीच आरोग्य विभागाने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.
पुणे पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणात तत्काळ तपासाला सुरूवात करत एकाला अटक केली आहे. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विजय मुराडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.