माणगाव: भारतीय हवामान विभागाने(IMD) दिलेल्या सुचनेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थितीमुळे समुद्र किनारपट्टी(Coastal Area) व खाडीलगतच्या भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने १६ व १७ मे रोजी रायगड(Raigad) जिल्ह्यातही ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. हिंद महासागरातुन अरबी समुद्राकडे आलेले तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) रायगड जिल्ह्यात वादळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकांमध्ये या वादळाच्या वेगाचीच जास्त चर्चा ऐकावयास मिळत आहे.
[read_also content=”तौते चक्रीवादळाचा देशभरात विविध ठिकाणी तडाखा – घरांचे नुकसान, झाडेही उन्मळून पडली, मुसळधार पावसाची हजेरी https://www.navarashtra.com/latest-news/house-collapsed-and-trees-fall-in-various-places-of-india-due-to-cyclone-tauktae-nrsr-129321.html”]
वादळाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्कालीन निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १२० किमी सांगण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र तो १४० किमी इतका होता. आजही त्या आठवणीने अंगावर काटा उभा राहतो. घोंगावणारा चित्कारणारा वारा आणि खेळाच्या पत्त्यांप्रमाणे घरांवरील इमारतीवरील पत्रे छप्पर उडून झालेले नुकसान, शेकडो वर्षांचे महाकाय वृक्ष उन्मळुन पडले, माडाची झाड अर्धवट मोडली. माड-सुपारीच्या बागा उध्दवस्त झाल्या होत्या. संपूर्ण महावितरण व्यवस्था कोलमडली वीजेच पोल वाकले, पिळले तारा मोडल्या अनेक दिवस अनेक गावे अंधारात गेली.
त्या प्रचंड वेगाने माणसाच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सर्वत्र या वेगाचीच चर्चा आहे. सोशल माध्यंमावर काल झालेल्या वादळी पावसाची छायाचित्र फिरत आहेत. जराशा वादळाने पत्रे उडाले झाडांच्या फांद्या पडल्या पाऊस पडला हे पाहता लोकांच्या मनात उद्याच्या वादळाचे काहुर माजले आहे.
रात्रीचे वादळ झाले तर काय अवस्था होईल याची मनात भिती आहे. शासनाच्या पूर्व सुचना, हाय अलर्ट संदेश सर्वत्र फिरत आहेत. दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी रात्री तासभर पाऊस पडला मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे प्रचंड उष्णता वाढली आणि त्यातच काही काळ वीज खंडीत झाली. माणसाचे जीवन त्रस्त झाले आहे. वादळाच्या भितीने लोक आवश्यक साहित्य व लाईट गेल्यास तात्पुरत्या तयारीस लागले आहेत.
हाय अलर्ट
रायगड जिल्ह्यात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात जोरदार वारे मुसळधार पाऊस होऊ शकतो. माणगांवकरांनी सतर्क राहुन स्वतःची व स्वतःचे कुटुंबाची काळजी घ्यावी. नागरिकांनी या कालावधित कोणतीही मदत लागल्यास माणगांव नगरपंचायत आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक ०२१४०२६३०५६ तसेच ९६०७५६४३२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन माणगाव नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच घरात पिण्याचे पाणी व खाण्याच्या पदार्थांचा पुरेसा साठा करुन ठेवणे, नागरिकांनी स्वतःची वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करुन ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस पडते वेळी घरातील काचेच्या खिडक्यांपासुन दूर राहावे. धोकादायक व कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांनी या कालावधित सुरक्षित ठिकाणी स्वतःची राहणेची व्यवस्था करावी. ज्यांच्या घरांची छप्परे पत्र्याची आहेत त्यांनीपत्र्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. जेणे करुन नागरिकांचे जिवीतास हानी पोहचणार नाही. खोलगट भागात व ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचते त्याभागातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःचे घरातील सामानाची काळजी घ्यावी. आपल्या घराचे आजुबाजुस उंच झाडे असतील नागरिकांनी सावध सतर्क राहावे. अफवांकडे लक्ष देऊ नये वा अफवा पसरवु नये. शुन्य जीवितहानी हेच प्रशासनाचे ध्येय आहे. यासाठीच नागरिकांनी सतर्क राहुन सुचनांचे पालन करीत नगर पंचायतीस सहकार्य करावे, असे माणगाव नगरपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.