सातारा : सातारा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबतची चर्चा विभाग नियंत्रक यांच्याशी केली. तसेच एसटी स्टँड साताराच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती तातडीने करून घ्यावी, अशी मागणी आज निवेदनाद्वारे नियंत्रक राज्य परिवहन सातारा विभाग यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात सातारा एसटी स्टँडमधील दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आणि त्यामुळे अनेक दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सातारा एसटी स्टँड इमारत उभी करून पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक ठिकाणी पडझड झाली असून, इमारतीला गळती लागली आहे. यातून मोठा धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभाग नियंत्रकांनी स्वतः लक्ष घालून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच ज्या ठिकाणी पडझड झाली किंवा होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची दुरुस्ती ताबडतोब करून देण्याची मागणीसुद्धा निवेदनात केली.
यावेळी भाजपा सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड प्रशांत खामकर, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष रेपाळ, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, महिला मोर्चा सरचिटणीस हेमांगी जोशी, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचा संपाला पाठिंबा
भाजपने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला. सातारा जिल्ह्यातील सर्व डेपोवर जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी संपाला पाठिंबा देणार आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहेत.
– विकास गोसावी, शहराध्यक्ष, भाजप.