नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी राजकीय सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा (Support) दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) मुख्यमंत्री योगी यांचा विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे.
समाजवादी आघाडीत समाविष्ट बहुजन समाज पक्ष (BSP), सुहेल देव भारतीय समाज पक्ष आणि जनसत्ता दल यांनीही रालोआ उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त विरोधकांकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे.
ओमप्रकाश राजभर, जनसत्ता दलाचे नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया, बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते उमाशंकर सिंह आणि सपा आमदार शिवपाल सिंह यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना भाजप, अपना दल (एस), निर्बल भारतीय शोषित हमारा आम दलच्या (निषाद पार्टी) खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला आहे.