विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई : एकीकडे राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानुसार, अनेक तयारीही करण्यात आली. मात्र, विरारमध्ये एक दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीत 12 कुटुंब राहत होती. मात्र, अचानक इमारतीचा भाग कोसळल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले. यातून 9 जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ढिगार्याखाली आणखी काही नागरिक अडकले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांकडून श्वान पथक बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, चार मजली इमारतीमध्ये बारा कुटुंब राहत होती. त्यापैकी नऊ जणांना डिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर 20 ते 25 जण इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्याची भीती व्यक्त होत आहे.
मीरा रोड येथील इमारतीचा भाग कोसळला
दुसऱ्या एका घटनेत, मीरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना नुकतीच घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळला. या घटनेत चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे ४० वर्षे जुनी असलेली ही इमारत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.