देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये ‘नवोपक्रम व उद्योजकता विकास’ होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ तर्फे शिक्षणसंस्थांची नवोपक्रमातील उद्दीष्टपूर्ती या विषयक राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. २०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षणसंस्थानी या क्रमवारीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये आयआयटी, एनआयटी आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली.
याबाबत माहिती देताना नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्दीमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम आपण वर्षभारत घेतले. विद्यापीठात सात एक्सेलन्स सेन्टर आहेत. विद्यापीठात नवोपक्रम व उद्योग या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ अनेक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडले गेले आहे. सध्या विद्यापीठात ४० स्टार्टअप सुरू आहेत तर ३४० संलग्न महाविद्यालयात इनोव्हेशन सेल स्थापन केले आहे.
विद्यापीठातील नवोपक्रम केंद्राची सुरुवात होऊन अडीच वर्षे झाली आहेत. एवढ्या कमी कालावधीत राष्ट्रीय पातळीवर आपण तंत्रज्ञानातील विद्यापीठांसोबत स्पर्धा करत देशात आठव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र
विद्यापीठाने कॅम्पसवर व संलग्न महाविद्यालयात नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठीच ‘इनोव्हेशन सेल’ ची स्थापना विद्यापीठात केली आहे. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अटल क्रमवारीत मिळालेलं हे स्थान विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे.
प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ






