सतत मोबाईल चेक करण्याची सवय सोडायची आहे का ? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा
आजकाल मोबाईल ही एक गरज राहिली नसून ते व्यसन झालंय असं अनेकदा म्हटलं जातं. सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम्स यामुळे प्रत्येकाच्या हाताला स्मार्टफोन चिटकलेला असतो त्यामुळे सतत मोबाईल चेक करण्याची सवय अनेकांना असते. मात्र हीच सवय आता व्यसन झाल्याचं दिसत आहे. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा घरी असताना दर मिनिटाला स्मार्टफोनवर येणारं नोटीफिकेशन आणि सोशल मीडियावर अपडेट पाहायण्याची सवय सध्या घातक होत आहे. वारंवार मोबाईल चाळण्याची ही सवय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य विघडविण्याचं काम करत आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्हाला ही जर सतत मोबाईल चाळण्याची सवय असेल तर या काही टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या सवयीला नियंत्रणात आणू शकता.
इंटरनेटचा कमी वापर करणं
इंटरनेटच्या माध्यमातून विविध देशातील माणसं एकमेकांशी जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे इंटरनेटमुळे कोणत्याही क्षेत्राची माहिती अगदी कुठेही आणि कधीही मिळवणं शक्य झालं आहे. मात्र कोणत्याही गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त वापर कायम नुकसान करतं. तसंच काहीसं इंटरनेटच्या बाबतीत होताना दिसत आहे. सध्याच्या जगात इंटरनेट जीवनावश्क गरज झाली याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. सतत सोशल मीडियावर येणाऱ्या नोटीफिकेशन्समुळे मानसिक अस्वस्थता वाढते. म्हणूनच ही सवय कमी करण्यासाठी हळूहळू मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा. जेवढी गरज आहे तेवढाच इंटरनेटचा वापर करा. त्यामुळे मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकून राहील.
स्वत:ला इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा
मोकळा वेळ मिळाला की टाइमपास करण्यासाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुमचा मोकळा वेळ योग्य ठिकाणी वापरा. जसं कुटुंबातील माणसं एकत्र येत गप्पा मारणं, मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणं किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावणं यामुळे तुमची मोबाईल वापरण्याची सवय हळूहळू कमी होईल.
नोटीफिकेशन बंद ठेवा
मोबाईलचं वाढत जाणारं व्यसन कमी करण्साठी नोटीफिकेशनला साइलेंट मोडवर ठेवा. त्यामुळे सतत मोबाईलकडे लक्ष जाण्याचा प्रश्न राहत नाही. तुम्ही काम करत असताना किंवा इतर ठिकाणी तुमचा मोकळा वेळ सत्कारणी लावताना मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा. त्यामुळे मोबाईल चेक सवय हळूहळू कमी होईल.
छंद जोपासणं
प्रत्येक व्यक्तीमध्ये असं एखादं कौशल्य असतं जे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. मोकळ्या वेळेत तुम्ही तुमचे छंद जोपासण्याची सवय लावा. गाणी ऐकणं, चित्र काढणं, रांगोळी काढणं यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मोबाईल चेक करण्याची सवय हळूहळू कमी होण्यास मदत होते.
प्रणायाम
मोबाईलच्या जास्त वापराने मानसिक अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना जास्त निर्माण होते. जागतिक पातळीवर नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत असून मोबाईलचा अतिवापर हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळे मानतील अशांतता नष्ट करण्यासाठी आणि मेंदूला स्थिर ठेवण्याकरीता रोज प्रणायाम करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. प्राणायाम केल्याने विचारांवर आणि मनावर नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे सतत मोबाइल पाहण्याची सवय देखील हळूहळू कमी होते