पेठ वडगाव : शेजारील लोक चांगली वागणूक देत नाहीत, म्हणून वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या रजिया करीम अत्तार (रा. महालक्ष्मी नगर, पेठ वडगाव) या महिलेने पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावरच पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही महिला किरकोळ जखमी झाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद पोलिसात नव्हती.
पेठ वडगाव येथील महालक्ष्मी नगर येथे अतिक्रमण करून रजिया करीम अत्तार ही महिला राहते. शेजारील लोक व्यवस्थित वागत नाहीत. तुसडेपणाने बोलतात म्हणून पोलीस ठाण्यात गल्लीतील लोकाविरोधात तक्रार देण्यास त्या पोलीस ठाण्यात आल्या होत्या. गल्लीतील काही महिला अत्तार यांना गल्लीतून बाहेर काढण्यासाठी सह्या गोळा करत होत्या. तर एक युवक ही महिला येथून गेली नाही तर ऍसिड टाकून जगातून उठविण्याची धमकी देत होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
पोलिसही घेत नव्हते दखल
याबाबत पोलीस ठाण्यात संबंधित लोकांना बोलावून घेऊन ताकीद देण्याचे काम पोलीस अधिकारी करत होते. दरम्यान, रजिया यांना शेजारीलच कोणीतरी बोलल्याचा राग अनावर झाला. पोलिसही दखल घेत नाहीत या संतापातून पोलीस ठाण्याच्या गेटबाहेर जावून वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
पाय व हाताला किरकोळ जखम
ही घटना पाहिलेल्या परिसरातील लोकांनी पळत जाऊन पाणी मारून आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, यामध्ये संबंधित महिलेच्या पायाला व हाताला भाजून त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर वडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिसांत नोंद झाली नव्हती.