सौजन्य - सोशल मिडीया
हेमा माडगे यांनी इंदापूर तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे. निवडून येण्यापूर्वी त्यांनी भिगवण गावचे सरपंच पद भूषवले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकीय समीकरण
राजकीय समीकरणांमुळे भिगवण जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असतानाही, तालुक्यातील जातीय गणिते जुळवण्यासाठी ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी सोडण्यात आली होती. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असूनही पक्षाच्या आदेशाचा मान राखून हेमा माडगे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्या या त्यागाची आणि निष्ठेची दखल घेऊन त्यांना उपसभापती पदाची संधी मिळावी, असा सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र
भिगवण हे इंदापूर तालुक्याचे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या भागातील लोकसंख्या आणि जातीय समीकरणे पाहता, सुरुवातीच्या काळात का होईना, पण हेमा माडगे यांना संधी मिळावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. “हेमा माडगे यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आणि जनशक्ती दोन्ही आहे. भिगवणच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या राजकारणातील समतोलासाठी त्यांना उपसभापती पद मिळणे आवश्यक आहे, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.






