देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. ज्यात अनेक कोटींची संपत्ती असलेल्या खासदारांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती ही हजारो कोटींच्या घरात आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकसभेवर निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी 503 खासदार हे कोट्याधीश असल्याचे समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशाच्या संसदेत नव्याने दाखल झालेल्या देशातील 10 सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती जाणून घेणार आहोत.
‘ही’ आहे श्रीमंत खासदारांची यादी
– डॉ चंद्रशेखर पेम्मासानी : आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर डॉ.चंद्र शेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला आहे. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही होते. त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. ते या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत.
– कोंडा विश्वेश्वर रेड्डी – कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकीटावर तेलंगणातील चेलेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता. त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 4568 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.
[read_also content=”कर्जदारांना दिलासा; बँका कर्जवसुलीसाठी मनमानी करू शकत नाही – दिल्ली उच्च न्यायालय! https://www.navarashtra.com/business/relief-to-creditors-banks-cannot-be-arbitrary-for-loan-recovery-delhi-high-court-547615.html”]
– नवीन जिंदाल : भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकला आहे. जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती 1241 कोटी रुपये आहे. या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. यापूर्वीही ते दोनदा खासदार झाले आहेत.
– प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी : प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे व्हीपीआर मायनिंग इन्फ्राचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 716 कोटी रुपये आहे. तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 18 व्या लोकसभेतील ते चौथे सर्वात श्रीमंत खासदार आहेत.
– सीएम रमेश – भाजप नेते सीएम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते पूर्वी तेलुगु देसम पक्षाशी संबंधित होते. त्यांची एकूण संपत्ती 497 कोटी रुपये आहे.
– ज्योतिरादित्य सिंधिया : ज्योतिरादित्य सिंधिया हे देशाच्या राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपये आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तर यावेळी त्यांच्याकडे दूरसंचार मंत्रालय देण्यात आले आहे.
– छत्रपती शाहू महाराज – छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती 342 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
– श्रीभारत मथुकुमिली – श्रीभारत मथुकुमिली विशाखापट्टणममधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 298 कोटी रुपये आहे. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत.
– हेमा मालिनी – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. त्यांची संपत्ती 278 कोटी रुपये आहे.
– डॉ प्रभा मल्लिकार्जुन – डॉ. प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यांनी कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांची एकूण संपत्ती 241 कोटी रुपये आहे.