संग्रहित फोटो
पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनुसार, हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५), रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहेत. आरोपींशी त्यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखविले. नंतर त्यांना मोबाइलवरुन सोन्याचे बिस्कीट, तसेच दागिन्यांची फोटो पाठविले. ‘सोन्याचा सध्या दर कमी आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढणार आहे. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल’, असे आमिष त्यांना आरोपींनी दाखविले. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीला सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले.
आरोपींनी त्यांना ७ लाख २३ हजार रुपयांचे सोने, तसेच ७ लाख ९० हजार रुपये दिले. नंतर त्यांना उर्वरित रक्कम, तसेच स्वस्तात सोने मिळवून दिले नाही. परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले करत आहेत.
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चारेट्यांनी एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५४ वर्षीय हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. नंतर चोरट्यांच्या बँक खात्यात तक्रादाराने ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी १२ लाख ११ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.






