सातारा : जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रवाहाबाहेर राहिलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी दिवाळीच्या निमित्ताने राजकीय गाठीभेटींचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ चालविला आहे. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता उदयनराजे यांनी जिल्ह्यातील सर्वच आमदारांशी संवाद यात्रा सुरू ठेवल्याने राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली आहे.
उदयनराजे यांच्या राजकारणाची पध्दत ही कल्पनेच्या पलीकडची असते, याचा अनुभव सातारा जिल्ह्यानेच नव्हे तर राज्यानेही घेतला आहे. मग ती बारा वर्षांपूर्वीची भूमाता गौरव दिंडी असो किवा माजी आमदार विवेक पंडित यांच्या साताऱ्यातील मोर्चा वर स्वतः उदयनराजे यांनी केलेले अतिक्रमणं असो किंवा त्यांचे बहुचर्चित भीक मागो आंदोलन असो, राजकारणाच्या केंद्रबिंदूत राहून आपल्याला अपेक्षित असणारी राजकीय चर्चा घडवायची आणि विशिष्ट दबाव तंत्राद्वारे अपेक्षित परिणाम साधायचा. यामध्ये उदयनराजे वाकबगार आहेत.
राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने उदयनराजे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची दोनवेळा भेट घेतली. त्यानंतर दिवाळी शुभेच्छांचे निमित्त करत आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या सर्वच लोकप्रतिनिधींशी गाठीभेटी व अनौपचारिक चर्चांची राळ उदयनराजे यांनी उडवून दिली आहे.
राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सनान्माने आमंत्रण मिळावे यासाठीची ही राजकीय पेरणी असली तरी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्यांमधून उदयनराजे साधायचा तो राजकीय निशाणा साधतच आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना माझ्यावर अर्ज माघारीसाठी राजकीय दबाव येतोय म्हणून मी संरक्षण मागण्यासाठी आलोय, अशी मिश्किली उदयनराजे यांनी केली किंवा शिवेंद्रसिंहराजे यांना भेटणार नाही गाठणारच अशा सूचक विधानातून उदयनराजे यांनी अनुकुल वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालविला आहे .
उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व दूध उत्पादक मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे . या मतदार संघात 272 मते असून सर्वाधिक मते ही सातारा तालुक्यात 92 तर त्यानंतर कराड आणि फलटण तालुक्यात असल्याने उदयनराजे यांना किमान निम्म्या मेरिटचे मतदान म्हणजे 136 मतांची जुळणी करावी लागणार आहे . ही बाब म्हणावी इतकी सोपी नाही. सातारा तालुक्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची मजबूत पकड आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांना रामराजेंकडून दिलजमाईचा संदेश दिला जावा आणि गृहनिर्माणमधून आपली बिनविरोध निवड व्हावी हे राजकीय इप्सित साधण्याचा उदयनराजे यांचा राजकीय हट्ट आहे. मात्र, सातारा पालिका निवडणुकीतील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचा उदयनराजे यांनी घडविलेला पराभव हीच खरी दुखरी सलं असल्याने दोन्ही राजांमधील राजकीय दुरावा कायम आहे. त्यामुळे गृहनिर्माण मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उमेदवारांचे अर्ज कायम ठेवून उदयनराजे यांना खिंडीतच गाठायचे ही राष्ट्रवादीची रणनीती सध्या तरी यशस्वी होताना दिसत आहे.