“नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट (Sairat) सारखा चांगला चित्रपट केला आहे. त्यांना मी वेगळं प्रशस्तिपत्र देण्याची काही गरज नाही. याआधी सिनेसृष्टीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली आहे. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील”, अशी स्तुतीसुमन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उधळली आहे. आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत नुकतच नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी नागराज मंजुळे यांचा झुंड (jhund) सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर पत्रकारांशी गडकरी यांनी संवाद साधत या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं.
‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.
हा सिनेमा 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.