कल्याण : केंद्र सरकारने युजीसीच्या गाईड लाईन्सनुसार परीक्षांच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्यामुळे देशभरात परीक्षा होणार असल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत आहे. एवढ्या भयंकर महामारीत विद्यार्थी घरात पडलेल्या मृत्यूच्या सड्याशी दोन हात करेल, रिकाम्या पोटाला भरण्यासाठी धडपड करेल की अंतिम सत्राच्या परीक्षा देण्याची तयारी करेल असा सवाल उपस्थित करत युजीसी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
कल्याण नजीक असलेल्या मैत्रकुल येथील शांतीवनात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेले कित्येक दिवस विद्यार्थी भारती केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात पत्र, इमेल आणि ट्विटरच्या माध्यमातून लढत आहे. पण याकडे सातत्याने दुर्लक्ष करून विद्यार्थ्याचे जीवन धोक्यात टाकण्याची शपथ घेतल्यासारखे केंद्र सरकार वागत आहे आणि विद्यार्थ्याना समजून घेण्याचे दूर उलट त्यांच्या जीवाची तुलना दारूच्या दुकानांशी युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन करीत आहेत. याचा विद्यार्थी भारती संघटना धिक्कार करते.
आज परिक्षेमुळे इस्राईल सारख्या देशात जे झाले त्याचे उदाहरण समोर आसताना केंद्र सरकार मुलांना मृत्यूच्या दारात का ढकलत आहे असा सवाल आहे. आज कोरोनामुळे तरुण मुलं मृत्युमुखी पडण्याची उदाहरणं डोळ्यासमोर असताना केंद्राचा हा बालिशपणा अस्वस्थ करणारा आहे. या परीक्षांच्या निर्णयात स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या राज्य सरकारच कौतुक आहे. मात्र केंद्राच्या या मनमानी कारभाराचा त्वरित विरोध करणे गरजेचे आहे म्हणून आजपासून आमरण उपोषणाला सुरवात केली असल्याची प्रतिक्रिया मंजिरी धुरी यांनी दिली. तर सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले पाहिजे, एटीकेटी / बॅकलॉग च्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप देण्यात यावी, कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्था कडून फी देण्यात येऊ नये. कोणत्याही प्रकारचे लेक्चर व सबमिशनची सक्ती या काळात नसावी. आदी प्रमुख मागण्या त्यांनी या उपोषणाद्वारे सरकारकडे केल्या आहेत.