लग्न करण्यापूर्वी कोणत्या प्रश्नांची चर्चा होणे गरजेचे (फोटो सौजन्य - iStock)
लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा प्रश्न नाही किंवा काही दिवसांचा खेळ नाही. लग्न ही आयुष्यभराची वचनबद्धता आहे, ज्यामध्ये दोन विचार, दोन कुटुंबे आणि दोन जीवन एकत्र येतात तेव्हा घडते. त्यामुळे विचार न करता लग्नाबद्दल घाईघाईने घेतलेला निर्णय पश्चात्तापाचे कारण बनू शकतो. म्हणूनच, लग्नापूर्वी, काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तुमच्या भावी जोडीदाराशी प्रामाणिकपणे चर्चा केली पाहिजे. आम्ही तुम्हाला अशाच ४ महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रत्येक जोडप्याने लग्नापूर्वी केल्या पाहिजेत.
समुदेशक अजित भिडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वय झालंय किंवा घरून लग्नाचा दबाव आहे अथवा आपल्या मित्रमैत्रिणींची लग्न झाली आहेत म्हणून तुम्ही लग्न करायला तयार होताय असं अजिबात करू नका असंही त्यांनी सांगितलं आहेत. इतकंच नाही तर जोडीदार निवडताना त्यांना कोणते प्रश्न विचारायला हवेत याबाबत आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
आर्थिक नियोजन
डेटिंग असो वा लग्न नातेसंबंध सुरू करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक नात्यात पैशाची भूमिका महत्त्वाची असते आणि जर त्यावर उघडपणे चर्चा केली नाही तर भविष्यात समस्या उद्भवू शकतात. घर कसे चालवायचे हे ठरवणे महत्वाचे आहे यासाठी लग्नापूर्वीच ही गोष्ट क्लिअर करणे गरजेचे आहे. जर दोन्ही जोडीदार कमावतात तर कोण काय जबाबदारी घेईल हे ठरवणे महत्वाचे आहे. यासोबतच, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मासिक खर्च आणि बचतीबद्दलदेखील बोलले पाहिजे.
करिअर
आजच्या काळात, पुरुष आणि महिला दोघांसाठीही करिअर महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे, दोघांच्याही करिअर आणि वैयक्तिक ध्येयांबद्दल चर्चा व्हायला हवी. लग्नानंतर कोणाला त्यांचे करिअर पुढे न्यायचे आहे अथवा दोघांचे ध्येय आणि अपेक्षा काय आहेत हे दोघांनाही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यासोबतच, लग्नानंतर नोकरीच्या ठिकाणानुसार जुळवून घेणे, मुले झाल्यानंतर करिअर ब्रेक, या सर्व गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा करायला हवी.
नातं तोडणारा नाही तर जोडणारा ‘घटस्फोट’! काय आहे Sleep Divorce? जो जोडीदारांना आणतो जवळ
मुलांसाठी नियोजन
लग्नानंतर अनेक जोडप्यांना मुलांबाबत समस्या येऊ लागतात. लग्नापूर्वी मुलांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. मुले कधी असावीत, किती असावीत, त्यांचे संगोपन कसे होईल आणि त्यांचे आर्थिक व्यवहार अर्थात पुढे त्यांच्या खर्चाबाबत, त्यांची शाळा या सगळ्या विषयावर अगदी मोकळेपणाने दोन्ही जोडीदारांमध्ये चर्चा व्हायला हवी. लग्न करू आणि मग नंतर पाहू असं करणं योग्य नाही आणि हल्ली अनेकांना मूल नको असते या गोष्टीचीही चर्चा दोघांनी आधीच करावी अन्यथा नंतर घटस्फोटाचे हे कारण ठरू शकते.
कुटुंबाबद्दल चर्चा
भारतासारख्या देशात, लग्न दोन व्यक्तींमध्ये तसेच दोन कुटुंबांमध्ये होते. लग्नापूर्वी एकमेकांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच, प्रत्येकाचे कुटुंब वेगळे असते. प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे नियम असतात, जे नवीन व्यक्तीलादेखील पाळावे लागतात. लग्नापूर्वी कुटुंबाबाबतच्या जबाबदाऱ्या आणि नियमांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
घरात कोण राहतं, त्यांच्या बेसिक आवडीनिवडी आणि आपण किती जणांबरोबर घरात राहणार आहोत, त्यासाठी आपली मानसिक तयारी आहे की नाही या सगळ्या गोष्टींचीही चर्चा दोन्ही जोडीदारांमध्ये व्हायला हवी. कारण लग्न झाल्यावर अचानक जबाबदारी पेलणे शक्य होत नाही आणि यामुळे घटस्फोटही होतात.
जोडप्यांनो! ही बातमी वाचाल तर वाचाल, ‘या’ चुका नात्याला करतात कमजोर