पंचगुणी लस (फोटो सौजन्य - iStock)
मुंबई/नीता परब: हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचे मेकओव्हर करण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली हाेती. या समितीचा अहवाल शासनास नुकताच सादर करण्यात आला आहे. या समितीच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने व समितीने सुचवलेल्या नव्या सूचनानुसार, बालकांसाठी पंचगुणी लसीची निर्मिती करण्याबाबत महत्वपूर्ण सूचनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
त्याअनुषंगाने हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाने सदर लसीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून, हा प्रस्ताव लवकरात लवकर अंमलात आणण्याबाबत शासन दरबारी हालचाली सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ही पंचगुणी लस जन्मजात बालकांसाठी वरदान ठरणार आहे
तांत्रिक कारणांमुळे त्रिगुणी लस कालबाह्य
हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाची नवजात बालकांसाठी त्रिगुणी लस उपलब्ध हाेती. एकाच लसीमध्ये घटसर्प, डांग्या खाेकला, धनुर्वात असे तीन आजारांवर एकच रामबाण उपाय अशी त्रिगुणी लस हाेती. कालांतराने, काही कारणास्तवर हाफकीनला ही लस बंद करावी लागली.
सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
पंचगुणी लस निमिर्तीसाठी ३०० काेटींचा प्रस्ताव
हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचा कायापालट करण्यासाठी शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने हाफकीन महामंडळाची पाहणी केली असता, हाफकीनची गुणवत्ता, संशाेधन व विश्वासार्हता पाहता हाफकीन विविध आजारांवर औषध निर्मिती करु शकते, हे दिसून आले. त्याच अनुषंगाने संस्थेला आर्थिक पाठबळ मिळाल्यास नवजात बालकांसाठी पंचगुणी लसीची निर्मिती करू शकते, असा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आला. त्यानुसार या सूचनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु असून या निर्मितीसाठी ३०० काेटींचा प्रस्ताव असून यासाठी स्वतंत्र प्रयाेगशाळा देखील उभारण्यात येईल, या प्रस्तावाची अंमलबाजवणी झाल्यास साधारण वर्षभरात हा प्रस्ताव मार्गी लागेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
पंचगुणी लस म्हणजे काय?
एकाच लसीमध्ये घटसर्प, डांग्या खाेकला, धनुर्वात,हिपेटायटिस बी आणि हिमोफिलिया एन्फ्लुन्झा अशा पाच आजारांची एकच मात्रा असणार आहे. नवजात बालकांना आजघडीला विविध लस दिल्या जात आहेत. पण त्याऐवजी ही एकच लस दिल्यास बालकांना विविध आजारांची लागण हाेणार नाही आणि ही लस मुलांसाठी वरदान ठरणार आहे.
‘पंचगुणी लसीचा प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. सध्या पंचगुणी लसीचा प्रस्ताव शासन दरबारी असून त्यावर विचारविनिमय सुरु आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न वेगाने सुरु असून लवकरात लवकरात शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे’ – सुनील महिंद्रकर, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ